– स्मृती, शफालीची २५० धावांची सलामी
– दमदार सलामीने घडवला विश्वविक्रम
– स्मृतीचे ९० चौकार, कसोटीत ५०० धावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची जोडी स्मृती मानधना आणि शफाली (Shafali Verma) वर्मा यांनी महिला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी या दोघींनी २५० धावांची दमदार सलामी देत विश्वविक्रम केला.
महिला कसोटी क्रिकेटच्या ९० वर्षाच्या इतिहासात कोणत्याही सलामी जोडीला पहिला विकेटसाठी २५० धावांची सलामी देता आली नव्हती. मात्र स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा यांनी हा इतिहास घडवला.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताच्या सलामीवीर जोडीने दमदार सुरूवात केली.
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पहिल्या दोन सत्रातच जेरीस आणले. या दोघींनी आक्रमक फलंदाजी करत २९२ धावांची खणखणीत सलामी दिली. यात स्मृती मानधनाचे १४९ धावांचे योगदान राहिले. तिचे दीडशतक अवघ्या एक धावेने हुकले. दुसरीकडे शफाली वर्माने १५० धावा करत आपले पहिले वहिले कसोटी शतक मोठे केले.
स्मृतीच्या कसोटीतील ५०० धावा पूर्ण
स्मृती (Smriti Mandhana) मानधनाने कसोटीतील आपल्या ५०० धावा देखील पूर्ण केल्या. यापूर्वी भारताची माजी कर्णधार मिताली राजने अशी कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मितालीच्या नावावर होता. तिने ८७ चौकार मारले होते. तो विक्रम आता स्मृतीच्या नावावर असून तिचे कसोटीत ९० चौकार झाले आहेत.