khabarbat

Advertisement

NEET Paper Leak : ‘ नीट ‘ पेपर फुटीचे लातुरमध्ये नेटवर्क, एक शिक्षक ताब्यात

 

 

khabarbat News Network

 

लातूर : नीट (NEET) पेपरफुटीला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले. शनिवारी नांदेड (ATS) एटीएसने चौकशी करून सोडून दिलेल्या दोन शिक्षकांपैकी जलील पठाण या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शहर पोलीस उप अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांसमोर पठाण यांची चौकशी करण्यात आली. रात्री बारानंतर पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार केली.

पेपरफुटी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारपासून आतापर्यंत यात किती लोकांची चौकशी झाली? किती जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला? याबाबत स्पष्टता नाही. मात्र जाधव आणि पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

शनिवारी सकाळपासून नांदेड येथील पथक लातूर शहरात माहिती घेत होते. त्यानंतर त्यांनी पठाण आणि जाधव नावाच्या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांच्या मोबाईलमधील डेटाची माहिती घेण्यात आली. यानंतर दोघांनाही सोडण्यात आले होते.

पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी पठाण यांनी माध्यमांसमोर येत, मला चौकशीसाठी बोलवले होते. पोलिसांनी सन्मानाने मला रात्री घरीही सोडले अशी माहिती दिली. विनाकारण माझी बदनामी केली जात असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. या सर्व बाबी संध्याकाळी पाच वाजता त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केल्या. मात्र, अवघ्या तीन तासांत पठाण यास पोलिसांनी ताब्यात घेउन गुन्हाही दाखल केला.

पोलीस अधीक्षकापासून विविध अधिकारी आणि पथकांनी कसून चौकशी केली. या प्रकरणातील दुसरे शिक्षक जाधव हे पोलिसांच्या ताब्यात आहेत का? याबाबतची माहिती मात्र पोलिसांनी दिली नाही. त्यांचा शोध सुरू आहे.

कोण आहेत हे दोन शिक्षक?

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोन शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील असून एक लातूर आणि एक सोलापुरात कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागांत राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद (Latur) लातूर यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कातपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जलील पठाण यांच्या विषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. या शाळेतील सर्व कागदपत्रे सील करण्यात आली आहेत. अशी माहिती आता समोर आली आहे. अजून काही जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

या दोन शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. इतर राज्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार काय आहेत. किती आहेत याची माहिती तपासाअंती समोर येणार आहे. राज्यभरात कुठे कुठे यांचे कनेक्शन आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »