khabarbat News Network

लक्ष्मण हाकेंच्या भेटीत गिरीश महाजनांची ग्वाही
संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, हा मुद्दा हळूहळू तापत चालला आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावत चालली आहे.
ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांची आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मराठ्यांना कुणबी ठरवून ओबीसीमधून आरक्षण द्यावे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश केल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल यासाठी लक्ष्मण हाके यांचे मागच्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे.
आज (दि. २१) राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे आणि उदय सामंत यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. उपोषण मागे घेण्याची त्यांना विनंती केली. लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषण त्यांनी सोडावे यासाठी त्यांना विनंती करायला आलो आहे. शासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. ओबीसी, मराठा समाजाबाबतही सकारात्मक आहे. आपल्याला अपेक्षित असणारी पावल सरकार उचलणार, असे गिरीश महाजन म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत नवनाथ आबा वाघमारे देखील उपोषणाला बसले आहेत.
“मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही. इथलं शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं पाहिजे. पहिल्या नाही तर दुसऱ्या टप्प्यात यावर तोडगा निघेल” असं गिरीश महाजन म्हणाले.
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवच्या गोविंदपूरमध्ये दोन कार्यकर्तेही उपोषणाला बसले आहेत. शंकर कराड आणि नानासाहेब मुंडे यांचं गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. लक्ष्मण हाकेंची मागणी मान्य करत, ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
२०० गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे
जालन्याच्या वडीगोद्री येथे हाके यांचे उपोषण सुरू केले आहे. हाके यांना मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातुन ओबीसी बांधवांचा हाके यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नांदेड मध्ये अनेक ठिकाणी उपोषण, रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आज प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेडमधून ओबीसी बांधव २०० गाड्यांचा ताफा घेऊन आपले समर्थन दर्शविण्यासाठी वडीगोद्रीकडे रवाना झाले.
थर्माकोल जाळून रस्ता रोको
परळी-बीड राज्य महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये थर्माकोल जाळून रस्ता रोको करण्यात आला. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत या छत्रपती संभाजी महाराज चौकात राज्य महामार्गावर सकल ओबीसी समाजाच्या वतीने थर्माकोल जाळुन घोषणाबाजी करत रोको करून निदर्शने करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे.