शरद पवार यांनी दिले संकेत…
काँग्रेसमध्ये विलिन होणार प्रादेशिक पक्ष!
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच नजीकच्या भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह देशांतील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलिन होतील असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे ते काँग्रेसमध्ये विसर्जन करू शकतात.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारख्या विचारधारेशी ठाकरे गटाची शिवसेना सकारात्मक आहे, असे सांगत शिवसेना देखील काँग्रेसमध्ये विलीन होवू शकते असे संकेत शरद पवार यांनी दिले. एकंदरीत 4 जून रोजी निवडणूक निकाल लागल्यानंतर सत्ता लालसेच्या अनुषंगाने प्रादेशिक पक्ष एक तर BJP किंवा Congress ची वाट धरू शकतात, हे निश्चित.
तथापि, याच मुद्द्यावर पुढे शरद पवार यांना त्यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षही काँग्रेसमध्ये विलिन होणार का? असे विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, आमचा पक्ष गांधी आणि नेहरुंच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आमची आणि काँग्रेसची विचारसरणी एकच आहे.
याचबरोबर पवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलिन करायचा की नाही, हे सहका-यांशी चर्चा केल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. आमची विचारसरणी काँग्रेसच्या जवळची आहे यात शंका नाही. पण कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास आम्ही तो एकत्रितपणे घेऊ. आणि असा निर्णय झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पचवायला खूप अवघड जाईल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या समविचारी पक्षांबरोबर काम करण्यास उद्धव ठाकरेही सकारात्मक आहेत. त्यांचे विचारही आमच्यासारखेच आहेत. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांना जाणवले की, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप विरोधात अंडरकरंट आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशासह देशातील इतर भागांतही भाजपविरोधात वातावरण असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राजकियदृष्या त्यांना पुन्हा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, आमचे पवार कुटुंब दरवर्षी दिवाळीला बारामतीमध्ये एकत्र येते. पण त्यांना राजकीयदृष्ट्या परत यायचे असेल तर आम्ही ‘त्यांना’ स्वीकारणार नाही.