प्रत्येक रस्त्याच्या कडेला पान विक्रेत्याची लहानशी टपरी आपण रोजच पाहत असतो. किमान २० रूपयांपासून पान विकून विक्रेता आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असतो. मात्र आजवर कधी एखादा करोडपती पानवाला पाहिला का? चला, आम्ही त्याची भेट करून देतो. हा पानवाला खूप प्रसिद्ध तर आहेच, विशेष म्हणजे हा तो कोट्यधीश आहे. हा पानवाला सोन्याचे दागिने घालून टपरीवर बसून पान विकतो. आश्चर्य वाटले असेल, पण हे खरं आहे.
हा पानवाला दोन कोटींचे दागिणे अंगावर घालून पान विकतो. राजस्थानमधील बिकानेर येथील या पानवाल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण, सुमारे २ कोटी किंमतीचे आणि जवळपास दोन किलो वजनाचे सोने अंगावर घालून हा पानवाला पान विकतो.
त्याच्या अंगावर सोन्याच्या अंगठ्या, हार, कानातले दागिणे घालूनच तो आपली पानाची टपरी उघडतो आणि मग पान बनवून लोकांना खायला घालतो. या कोट्यधीश पानवाल्याला पाहण्यासाठी दररोज लोकांची गर्दी जमते.
बिकानेरच्या सट्टा बाजारात मुळसा फुलसा पान विक्रेता आहे. या पान विक्रेत्याचे पान जसे प्रसिद्ध आहे, तसेच सोन्याचे दागिने घालून पान विकणारा मालकही खूप प्रसिद्ध आहे. मुळसा फुलसा पानाचे दुकान सुमारे ९३ वर्षे जुने आहे. पूर्वी हे मूळचंद आणि फूलचंद नावाचे भाऊ पान टपरी चालवत होते. पण आता फुलचंद मूलचंद यांचा मुलगा हे पानाचे दुकान चालवत आहे. पानाची किंमतही १५ ते २० रुपयांच्या आसपास म्हणजे खिशाला परवडणारी आहे.