khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

अब की बार, ४ सौ पार : काँग्रेसचा विक्रम मोडण्यासाठी मोदींचा अट्टाहास!

विश्लेषण । श्रीपाद सबनीस

 

‘अब की बार, ४ सौ पार’ हा नारा देशभरातील काना-कोप-यात गेल्या काही दिवसांपासून घुमू लागला आहे. (PM Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांच्या तोंडून तो सतत ऐकायला मिळतो. मात्र या ‘४ सौ पार’चा अट्टाहास नरेंद्र मोदींनी का धरला आहे, हे कदाचित सामान्य भाजप कार्यकर्त्यांना देखील माहिती नसावे म्हणूनच या घोषवाक्यामागे दडलेला इतिहास आणि आजची राजकीय सद्यस्थिती या दोन्ही बाबी समजून घेणे तितकेच महत्वाचे ठरते.

अर्थातच कोणाच्या खात्यात लोकसभेच्या किती जागा जातील हे येणारा काळच ठरवेल. मात्र भारतीय लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता ४०० पेक्षाही अधिक जागा एखाद्या राजकीय पक्षाने मिळवणे हे निव्वळ ऐतिहासिक होते. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजीव गांधी आणि (congress) काँग्रेससाठी देशभर सहानुभूतीची जबरदस्त लाट आली. या सहानुभूतीच्या लाटेत एकूण ५१४ पैकी काँग्रेसला ४०४ जागांवर विजय मिळाला. हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला. या निवडणुकीत ३,७९१ अपक्ष उमेदवार देखील होते.

काँग्रेसला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्रमी यश मिळाले ते इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येमुळे जी सहानुभूतीची लाट आली त्याचा तो परिणाम होता, अशी तार्किक मांडणी राजकीय विश्लेषक करीत असतात. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत १,२४४ राष्ट्रीय पक्ष आणि १५१ प्रादेशिक पक्षांचे मिळून सुमारे ५,३१२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. याशिवाय ३,७९१ अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत सहभाग घेतला होता, त्यापैकी अवघे ५ जण लोकसभेत पोहोचले.

Advertise with us

१९८४ मध्ये काँग्रेस ४००+

१९८४ ते २०१४ या कालखंडातील ही अशी एकमेव सार्वत्रिक निवडणूक होती ज्यामध्ये, कोणा एका राजकीय पक्षाला निर्विवाद स्पष्ट बहुमत मिळाले होते. इतकेच नव्हे, तर कोणा एका राजकीय पक्षाला लोकसभेच्या ४०० पेक्षाही अधिक जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधानपदी राजीव गांधी (gandhi) यांची निवड झाली होती. १९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली. त्यावेळी ४८९ पैकी ३६४ जागा काँग्रेसला होत्या. १९५७ साली झालेल्या दुस-या निवडणुकीत ४९४ पैकी ३५७ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. हा विक्रम १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनेच मोडला आणि नवा उच्चांक प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता हाच विक्रम मोडायचा आहे. त्याचसाठी ‘अब की बार, ४ सौ पार’चा अट्टाहास त्यांनी धरला आहे. तथापि, भाजप ३७० जागा मिळवेल असा विश्वास भाजपचे वरिष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.

एक मात्र खरे की, १९८४ च्या निवडणुकीतील ४०४ जागांचा विक्रम केवळ काँग्रेसच्या नावावर नोंदवला गेला. मात्र ‘अब की बार, ४ सौ पार’चा पल्ला कदाचित (BJP) भाजपाने गाठला तरी काँग्रेसचा तो विक्रम मोडला जाणार नाही. कारण, हा विजय एकट्या भाजपचा किंवा मोदींच्या लिडरशिपचा असणार नाही; तर तो NDAचा असेल.

२२४ पैकी भाजपला अवघ्या २ जागा

भाजपच्या दृष्टीने १९८४ ची निवडणूक ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. १९८० साली जनसंघातून विभक्त झाल्यानंतर भाजपची स्थापना झाली आणि पक्षाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले. मात्र नव्यानेच अस्तित्वात आलेल्या भाजपला १९८४ च्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत उल्लेखनिय अशी छाप पाडता आली नाही. भाजपने २२४ जागांवर निवडणूक लढविली, मात्र अवघ्या दोन जागांवर विजय मिळवता आला होता.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकसभेच्या ५८ मतदार संघात सर्वोत्तम कामगिरी केली होती. गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगड आणि दिव दमण ही ती राज्ये होत. या राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. काही राज्यामध्ये मित्र पक्षांचे पाठबळ मिळाले. परंतु, याच मित्र पक्षांमुळे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४००+ चे ‘ड्रीम टार्गेट’ कसे पूर्ण होणार याची आता उत्सुकता सा-यांना लागली आहे. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या राज्यनिहाय कामगिरीवर एक नजर टाकणे गरजेचे ठरते.

देशात अशी काही राज्ये आहेत की, जिथे भाजपने ९० टक्के जागा जिंकल्या होत्या. यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे. भाजपने येथे एकूण ५४ पैकी ५२ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकात भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष उमेदवारास भाजपने पाठिंबा दिला होता. परंतु, २०२४ च्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकमध्ये जनता दल (सेक्युलर) सोबत युती केली आहे. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत येथे भाजपला जागा मिळू शकतील. जनता दल (सेक्युलर) सोबतच्या युतीमुळे भाजपला येथे ब-याच मर्यादा पडणार आहेत.

पंतप्रधान मोदींचे ‘ड्रीम टार्गेट’

महाराष्ट्रात भाजपच्या साथीला शिवसेना (शिंदे गट) आणि (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी मांडणी झालेलीच आहे. आता ‘मनसे’चे इंजिन या डब्यांना जोडण्याचा प्रयोग अमित शहा आणि (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी केला. धनुष्यबाण हाती घेतलेल्या ‘मनसे’सोबत महायुती ४८ पैकी ४१ जागा पटकावून पंतप्रधान मोदींची स्वप्नपूर्ती करेल का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या निवडणुकीत ८० पैकी ६२ जागा जिंकल्या. २०१४ च्या तुलनेत गेल्यावेळी भाजपला येथे नुकसान सहन करावे लागले होते. परंतु, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आता (RLD) रालोद सामील झाली आहे. त्यामुळे भाजपची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. तरी आरएलडी आणि अपना दल यांना जागा द्याव्या लागणार असल्याने भाजप येथे किमान ७६ जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे चार जागांचे नुकसान होत आहे.

छत्तीसगड आणि झारखंड या राज्यामधील जर सर्व जागा भाजपने जिंकल्या तर २०१९ च्या तुलनेमध्ये भाजपच्या पाच जागा वाढू शकतात. तर, आसाममध्ये भाजपने १४ पैकी १० जागा लढवल्या त्यातील नऊ जागा जिंकल्या. हा फॉर्म्युला असाच राहिला तर आसाम येथून एका जागेचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

अर्थातच काही राज्यामध्ये भाजपने स्थानिक पक्षासोबत हातमिळवणी करून जागा जिंकल्या होत्या. यात महाराष्ट्र आणि बिहारचा समावेश आहे. २०१९ मध्ये भाजपने महाराष्ट्रात २५ जागा लढवून २३ जागा जिंकल्या. तर, बिहारमध्ये १७ पैकी १७ जागा जिंकल्या. या राज्यांमधील जवळपास निम्म्या जागा मित्रपक्षांना मिळाल्या होत्या. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २६६ जागा आहेत. भाजपने कितीही क्लीन स्वीप केले तरी या जागा जास्तीत जास्त २५ इतक्याच वाढू शकतात.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ आणि ओडिशात २१ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनुक्रमे १८ आणि ८ जागा जिंकल्या. या दोन्ही राज्यांत भाजपचे मतदार वाढले ही जमेची बाजू ठरावी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची स्ट्रॅटेजी भाजपच्याच पथ्यावर पडणारी ठरू शकते. तर, ओडिशात नवीन पटनायक यांच्यासोबत युती झाल्याने भाजपचा वैयक्तिक फायदा मर्यादित होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Advertise with us

भाजपसाठी आश्वासक वातावरण

२०१९ साली भाजपला तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये आपले खाते उघडता आले नाही. पण, तेलंगणात ४ जागांचा फायदा झाला होता. मात्र आता या राज्यांमधील राजकीय कल काहीसा भाजपला अनुकूल होत चालला आहे. तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू पुन्हा ‘एनडीए’च्या गोटात डेरेदाखल झाले. त्यामुळे भाजपसाठी आश्वासक वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या १०१ जागा आहेत, यापैकी ५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने उराशी बाळगले आहे.

बिहार, झारखंड, उत्तरप्रदेशातील लहान-सहान पक्षांना सोबत घेत निघालेल्या भाजपने यंदा तामिळनाडूत ‘पीएमके’शी युती केली आणि वन्नियार समुदायाच्या साथीने राज्यात पाय रोवण्याची तयारी केली आहे. त्याचसोबत ‘एनडीए’चा घटक पक्ष राहिलेल्या अण्णाद्रमुकला धक्का दिला.

पंजाबमध्ये तूर्त तरी आप (AAP) आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मत विभाजन अटळ दिसते. याचा फायदा अकाली दल-भाजप यांच्यातील संभाव्य युतीला होऊ शकतो. पंजाबात लोकसभेच्या १३, मणिपूर, मेघालय आणि गोव्यात प्रत्येकी २, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी १ तर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या ५ जागा आहेत. पुद्दुचेरी, लडाख, अंदमान-निकोबार बेटे, दादरा नगर हवेली, लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी १ जागा आहे. या ३२ पैकी भाजपकडे केवळ ७ खासदार आहेत. त्यामुळे भाजपची मदार ही छोट्या-छोट्या राज्यावर अवलंबून आहे, हे स्पष्ट आहे.

भारतातील एकूणच सामाजिक, भौगोलिक वैविध्य आणि राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एव्हाना भाजपला स्वत:च्या मर्यादांची ब-यापैकी जाणीव झाली आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ची हाक देत समविचारी आणि ‘एनडीए’मधील इच्छूक घटक पक्षांना सोबत घेत एकत्रितपणे ‘अब की बार, ४ सौ पार’च्या संकल्पपूर्तीचा घाट घातला आहे.

Mobile : 99605 42605

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like