khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Election -2024 : लोकशाहीच्या मंदिरात, ‘इलेक्शन’चा पुजारी 

 

– १४ विधानसभा, ९ लोकसभा लढल्या

– निवडणुकीसाठी ५० एकर शेती विकली

– बापकळ (Jalna, Maharashtra) च्या मंदिरात वास्तव्य

 

राजेंद्र घुले | जालना

लोकशाहीवर दुर्दम्य विश्वास असणारे बाबासाहेब शिंदे (रा. बापकळ) हे निवडणूक लढण्याची तपश्चर्या कायम ठेवणार असून १४ विधानसभा व ९ लोकसभा निवडणुकीसाठी ५० एकर शेती विकून भूमीहीन झालेले शिंदे हे लोकवर्गणीतून यंदा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शेतकरी, सर्वसामान्य माणूस, तरूण हा आपला मतदार असून तो आपल्याला निवडून देईल, असा आत्मविश्वास असलेले शिंदे यांनी सन १९८० मध्ये अपक्ष म्हणून बदनापूर विधानसभेची निवडणूक लढवली, त्यात त्यांना २७३ मते मिळाली. यासाठी त्यांनी थोडीफार शेती विकली होती.

आज ना उद्या मतदार आपल्याला निवडून देतील, असा विश्वास असलेले शिंदे यांनी पुन्हा शेत जमीन विकत १९८५ मध्ये जालना व बदनापूर विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये तर त्यांनी जालना, बदनापूर, भोकरदन, अंबड, परतूर या पाचही विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा भीमपराक्रम केला होता. या निवडणुकीसाठीही त्यांनी शेत जमीन विकली होती.

शिंदे यांनी पुढे १९९५ मध्ये बदनापूर विधानसभेची, १९९९ मध्ये बदनापूर विधानसभेची, २००४ मध्ये बदनापूर विधानसभेची, २००९ मध्ये घनसावंगी विधानसभेची, २०१४ मध्ये भोकरदन विधानसभेची तर २०१९ मध्ये घनसावंगी विधानसभेची निवडणूक लढवली.

विधानसभेची निवडणूक लढवत असतांना बाबासाहेब शिंदे यांनी लोकसभा निवडणूकही सोडली नाही, १९८४ मध्ये त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली. यानंतर १९८९, १९९१, १९९६, १९९८, २००४, २००९, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकाही त्यांनी लढल्या.

१९९१ मध्ये परभणी लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढली. निवडणुकीसाठी शेत जमीन विकण्याच्या हट्टापायी त्यांना परिवारातील सदस्य मंडळींचा रोषही पत्करावा लागला.

१४ विधानसभा व ९ लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या वाट्याची ५० एकर शेती विकणारे बाबासाहेब शिंदे हे भूमीहीन झाल्याने शिवाय परिवारातील सदस्य मंडळींशी पटत नसल्याने ते आज बापकळ येथील मंदिरात वास्तव्य करीत आहेत.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र अनामत रक्कम भरण्याची तजवीज न झाल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहता आले नाही. शिंदे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ते २०१९ ची घनसावंगी विधानसभेची निवडणूक लढविणार नव्हते.

मात्र त्यांच्या हितचिंतक मंडळीनी आग्रह धरल्याने त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांच्या हितचिंतकांनी लोकवर्गणी करून त्यांची निवडणूक अनामत रक्कम भरली होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदोडे यांनी त्यांना मदत केली होती. 

आर्थिक स्थिती बिकट असल्याने २०२४ ची लोकसभा लढण्याची त्यांची तयारी नव्हती, मात्र गावकऱ्यांनी शिंदे यांना लोकसभेची निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे, लोकवर्गणीतून शिंदे यांचा निवडणूक खर्च करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतल्याने शिंदे हे सन २०२४ ची जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार झाले आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »