रांची : हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यासाठी हालचाल सुरू केली. पण हेमंत सोरेन यांचे लहान बंधू आणि हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला
झारखंडचे मु्ख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. झारखंड विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीमध्ये सोरेन सरकार पास झाले. चंपई सोरेन यांच्या समर्थनार्थ ४७ मते पडली, तर विरोधात २९ मते गेली.
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा, मनी लॉड्रिंगप्रकरणात ईडीने ३१ जानेवारीला अटक केली, त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केले आहे.
या बहुमत चाचणीला हेमंत सोरेन देखील उपस्थित होते, यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले. झारखंड मुक्ती मोर्चा नेतृत्त्वातील ४० आमदार थेट हैदराबादमध्ये गेले होते. त्यानंतर काल रात्री ते रांचीला परतले.
झारखंडमधील पक्षीय बलाबल…
८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे ४८ आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे २९, काँग्रेसकडे १७, राजदकडे १ आणि भाकप(एमएल) कडे १आमदार आहे.
विरोधी पक्ष एनडीएकडे ३२ आमदार आहेत. यामध्ये भाजप २६, एजेएसयू ३, एनसीपी (एपी) १ आणि २ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.