मंत्रिपदाच्या मुद्यावरून नितीशकुमारवर आगपाखड
पाटणा : नितीशकुमार यांनी ‘एनडीए’सोबत घरोबा करीत नव्याने चूल मांडली मात्र मंत्रिपदाच्या वाटपावरून निर्माण झालेल्या अस्वस्थता ब-यापैकी धुपू लागली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कॉँग्रेसने यास हवा दिल्यामुळे किंगमेकर ठरलेले जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले असून त्यांनी नितीशकुमार यांच्यावर मंत्रिपदाच्या आडून आगपाखड सुरू केली आहे.
प्रदेश काँग्रेसकडून जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून ही ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या प्रसृत झाल्या असून तूर्त तरी जीतनराम मांझी यांनी आणखी दोन मंत्रिपदांचा आग्रह मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे धरला आहे.
नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून एनडीएसोबत घरोबा केला, मात्र त्यांच्या नवीन सरकारमध्ये नाराजी दिसून येत आहे. नवीन सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले जीतनराम मांझी यांनी त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मंत्रिपदावरुन जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली.
मांझी यांनी सोमवारी सार्वजनिक कार्यक्रमामधून मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले, दरवेळी आमच्या पक्षाला एखादे मोठे मंत्रालय का दिले जात नाही? जेव्हा मी मंत्री होतो तेव्हासुद्धा एससी, एसटी मंत्रालय देण्यात आले आणि आता माझा मुलगा संतोष यास देखील हेच खाते देण्यात आले, आम्ही रस्ते विकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळू शकत नाहीत का? असे ते म्हणाले. जीतनराम मांझी यांचा पुत्र संतोषकुमार सुमर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती कल्याण ही खाती देण्यात आलेली आहेत.