भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता.
तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांचे रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोप केला आहे.