ताडोबामधील भानुसखिंडीतील नयनतारा नावाच्या एका बछड्याने चक्क पाण्याची प्लास्टिक बाटली तोंडात घेऊन पळ काढला. हा प्रकार जांभूळडोह येथे घडला. हे दृश्य छायाचित्रकार विवान कारापूरकर यांनी टिपले.
मुळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक बंदी असताना ही प्लॅस्टिकची बाटली जंगलात आलीच कशी, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
ताडोबातील अलिझंजा आणि रामदेगी बफर झोन परिसरात गेल्या काही महिन्यांपासुन भानुसखिंडी आणि बबली वाघिणीचा संचार आहे. भानुसखिंडीला तीन बछडे आहेत. त्यांचा कायम सोबत वावर असतो.
मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. तर असाच एक प्रकार निमढेला बफर क्षेत्रात घडला होता, ज्यामध्ये भानुसखिंडी या वाघिणीचे १५ महिन्यांचे तीन बछडे एका रबरी बुटांशी खेळताना एका वन्यजीवप्रेमींना दिसून आले. ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.