मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी तयारीला लागावे, नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी आपण जमलो आहोत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ठाणे येथील मेळाव्यात केले.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर वयाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. वय ८० झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून हा पक्ष अनेकदा सत्तेत आला. हसन मुश्रीफ, बाबा अत्राम, आदिती तटकरे, प्रफुल पटेल आम्ही सर्वांनी ठरवलं सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेमध्ये सहभागी झाले पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व नाही, भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून झालेले आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.