अवकाळी पावसाने कांदा आडवा, निर्यात बंदीने शेतकरी बेजार
गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक शेतातच आडवे झाले. परिणामी बाजारात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत, असा अंदाज व्यापा-यांनी वर्तविला.
याशिवाय डाळी, कडधान्ये, दैनंदिन वापरासाठी लागणारा भाजीपाला, यावर देखील अवकाळी पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. कांद्याची टंचाई भरून काढण्यासाठी परदेशातील कांद्याची आयात काही व्यापाऱ्यानी केली. मात्र या कांद्याला आपल्या कांद्याची सर नसल्याने, तो भारतीयांच्या पसंतीस उतरला नाही.
मुंबईच्या घाऊक बाजारात येणा-या एकूण कांद्यापैकी फक्त २० टक्के कांदा उत्तम दर्जाचा आहे. ८० टक्के कांदा दुय्यम दर्जाचा आहे. शेतकरी भिजलेला कांदा वाळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर ते शेतात नव्याने कांदा लावणार आणि तो कांदा बाजारात येण्यास पावसाळा उजाडणार, असे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे कांदा दरातही तेजी कायम राहणार, असा अंदाज व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवला आहे.
कांदा निर्यातबंदी
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी जाहीर केली. त्यामुळे राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये बंद पुकारण्यात आला. किरकोळ बाजारात आवक नसल्यामुळे कांदा महागणार आहे. लासलगावसह प्रमुख १५ बाजार समिती आणि दोन खाजगी अशा एकूण १७ बाजार समितींमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने घेतला. परंतु, विंचूरमध्ये कांदा लिलाव सुरू होते.
शेतकरी आक्रमक
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. पाच राज्यांमध्ये नव्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक व कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी केला.
दिल्लीत सोमवारी बैठक
कांदा प्रश्नावर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे आता दिल्लीत होणा-या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा : 99605 42605