दसरा मेळाव्यात दिसला संभ्रमाचा कल्लोळ!
वार्तापत्र / नितीन सावंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्कवर मेळावा घेतला तर शिंदे सेनेने आझाद मैदानात आपला दुसरा दसरा मेळावा साजरा केला. समस्त वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाबा (bhagwan baba) यांच्या गडावर (सावरगाव) भाजप नेत्या पंकजा (pankaja munde) मुंडे यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी नागपूरमधील रेशीम बागेत आपल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. मात्र एकुणात या साऱ्या सभांमध्ये संभ्रमाचाच कल्लोळ उठलेला पाहायला मिळाला.

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे (uddhav thakrey) यांनी नेहमीच्या जोशात भाषण केले. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मनोज जरांगे (manoj jarange) पाटील यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सुरुवातीला सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा ऐरणीवर आणल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाईलाजाने पाठिंबा द्यावा लागला.
शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची फसवणूक मराठा नेत्यांनीच केली. नारायण राणे (narayan rane) आणि रामदास कदम (ramdas kadam) यांच्यासारखे फायर ब्रँड मराठा नेते उद्धव ठाकरे यांना लाखोली वाहत शिवसेना सोडून गेले. काँग्रेसने प्रस्थापित मराठा नेत्यांना मोठे केले तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य मराठा शिवसैनिकांना नेते केले. मात्र शिवसेनाप्रमुखांनी क्षमतेनुसार या मंडळींना मोठे केले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे या मराठा नेत्याला मोठे केले ते सुद्धा शिवसेना सोडून गेले. मात्र गोरेगाव आणि मातोश्री पुरते मर्यादित असलेले सुभाष देसाई यांना उगाचच प्रतिष्ठा दिल्यामुळे अनेक मराठा नेते दुखावले गेले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे शरद पवार यांचे मित्र उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरही यावेळी उद्धव यांनी टीका केली. धारावीचे टेंडर मिळण्यापूर्वी अदाणी हे मातोश्रीवर जाऊन आले होते. तरी सुद्धा काय फिसकटले? हे उद्धव ठाकरेच सांगू शकतील. पुढचा दसरा मेळावा हा लोकसभा निवडणुकीनंतर होणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकीचे रणशिंगही या निमित्ताने फुंकले गेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मुख्यमंत्र्यांचा मेळावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत आपल्या मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ असे सांगून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देऊ असे ते म्हणाले. सध्या तरी मराठा समाजाचे आरक्षण कोणत्याही मुद्द्यावर कोर्टात टिकणार नाही हे सर्वांनाच माहित आहे. आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांना कोण कोर्टात पाठवते हे लपून राहिलेले नाही. मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आणि इतर समाजांना उचकवण्याचे काम भाजप आणि छगन भुजबळ करत असल्याचे लपून राहिलेले नाही. मात्र मराठ्यांना आरक्षण देऊ ही मुख्यमंत्र्यांची थाप मराठा (maratha) समाजाला कितपत पचणार आहे? हे काळच ठरवेल.
पंकजाताईंचे आव्हान
माधव फॉर्मुला वापरून भाजपला घराघरात पोहोचवणारे भाजपचे फायर ब्रँड नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आता लढाईस तयार झाल्या आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या तीन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राज्याच्या राजकारणातून कुणी संपवले? हे सर्वश्रुत आहे.त्यापैकी विनोद तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बांधणीमध्ये लक्ष घालून आपल्या नेत्यांचा विश्वास संपादन केला.एकनाथ खडसे पक्ष सोडून गेले आणि पंकजा ताई आरोप-प्रत्यारोपात अडकून पडल्या.
मात्र भगवान गडावरील दसरा मेळाव्याची गर्दी पाहिली असता भाजप नेत्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांचे बंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे हे भाजप आघाडीत आल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. आपण प्रीतम मुंडे यांच्या जागेवर अजिबात लोकसभा लढणार नाही, असे पक्षाला जाहीरपणे सांगितले आहे. त्यांच्यासोबत तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे आणि पडलेल्या राम शिंदे यांना विधानपरिषदेतील आमदारकी मिळाली पण पंकजा मुंडे यांना दिली नाही. मध्यंतरी त्यांनी काढलेल्या ‘ तीर्थ ‘ यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी त्याकडेही दुर्लक्ष केले. मात्र दसऱ्याला त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता वंजारी समाज अजूनही त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे.
सरसंघचालकांना फुटीची भीती
सरसंघचालक आता फूट पाडणाऱ्यांपासून सावधान रहा असे आवाहन करत आहेत. हिंदूंना मुस्लिमांच्या विरुद्ध भडकावून आपल्या मतांची बेगमी करणाऱ्या संघाला अचानक आता फुटीची भीती वाटू लागली आहे.
मणिपूर मधील मैतेई आणि कुकी समाजाच्या हिंसाचारामध्ये सीमेपलिकडील अतिरेकी होते का? असा संशय ही त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु केंद्रात आपल्या विचाराचे पंतप्रधान आणि गृहमंत्री असताना हा हिंसाचार का आटोक्यात आला नाही? मणिपूरचे मुख्यमंत्री आपल्या विचाराचे असताना त्यांची भूमिका काय होती? हे खरे तर सरसंघचालकांनी समजून घ्यायला हवे. आपल्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या सरकारने विकास केला असेल तर राम मंदिर, ३७० कलम आदि विषयांची गरज भाजपला का पडत आहे? याचाही उहापोह सरसंघचालकांनी करायला हवा.
Mobile : 9892514124