चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे. आज भारताच्या स्क्वाश टीमने पाकिस्तानला धूळ चारत गोल्ड मेडल मिळवले.
पुरुष स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. भारताने २-१ फरकाने पाकिस्तानवर मात करत सुवर्णपदकावर पटकावले.
पहिल्या सामन्यात भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताच्या सौरभने पुढील मॅच जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.
तिसरी मॅच भारताचा अभय आणि पाकिस्तानचा नूर यांच्यामध्ये पार पडली. या मॅचमध्ये पाच गेम्स खेळण्यात आल्या. अटीतटीच्या या सामन्यात अभयने पहिला गेम जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नूरने विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पाकिस्तानने विजय मिळवत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अभयने विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या सामन्यातील पाचवी गेम निर्णायक ठरली. या गेममध्ये १२-१० अशा फरकाने विजय मिळवत भारताने हा सामना आणि स्पर्धाही खिशात घातली.
एशियन गेम्समध्ये २०१० साली भारताच्या स्क्वाश टीमने पहिल्यांदा हजेरी लावली होती. यानंतर प्रत्येक एशियन स्पर्धांमध्ये भारताच्या स्क्वाश संघाने पदक जिंकले आहे. २०१४ साली झालेल्या एशियन गेम्समध्ये देखील भारताच्या पुरूष स्क्वाश संघाने सुवर्णपदक जिंकले होते.
जाहिरातीचं विश्वसनीय माध्यम : khabarbat.com । Call 99605 42605