एकीकडे पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना सात समुद्रापार महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचा यशस्वी प्रयत्न मराठीजणांनी केला. मुंबई, पुणे, नाशिकमधील ढोल-ताशा पथकाप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स स्वीडनमधील गोथेनबर्ग मध्ये पाहायला मिळाला. स्वीडनमधील नागरिकांनी या ढोल – ताशा पथकाच्या ठेक्यावर ताल धरत चांगलीच दाद दिली.
स्वीडनमध्ये पहिल्यांदा मराठीजणांनी ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले. या पथकाने स्वीडनमधील गणेश मंदिरात पहिला परफॉर्मन्स सादर केला. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये अभिनय सरकटे यांनी ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. तसेच गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले. या दोघांनी एकत्र येऊन दमदार सादरीकरण स्वीडनमधील रस्त्यांवर केले.
गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त या पथकाने सलग २ तास परफॉर्मन्स केला. यावेळी बाप्पा मोरयाचा जयघोष सुरु होता. ढोल-ताशाच्या तालावर स्वीडनमध्ये असलेल्या मराठीजणांनी ठेका धरला. सातासमुद्रापार महाराष्ट्रीयन सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार या मंडळींकडून होत आहे, या बद्धल प्रणाली मानकर यांचे कौतुक होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली वेशभूषा या पथकाने परिधान केली होती.