कोरोना आता नव्या अवतारात जगभर एन्ट्री करणार असल्याची वर्दी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भलेही कोरोनाची तीव्रता कमी झालेली दिसत असेल परंतु तो अजून नामशेष झालेला नाही. पुन्हा एकदा थैमान घालण्यासाठी तो नव्या रूपात सज्ज झाला आहे. कोरोनाचा विषाणू त्याचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला. बीए.२.८६ नावाचा हा कोरोना व्हेरिएंट अत्यंत घातक स्वरुपाचा असल्याचें दिसून आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या बीए.२.८६ ची माहिती देताना सांगिलते कि, जगभरातील अनेक देशांत बीए.२.८६ नावाचा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. इस्रायल, डेन्मार्क, अमेरिका आणि ब्रिटन तसेच स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत हा कोरोनाचा नवा अवतार (विषाणू) प्रकट झाला आहे.
बीए.२.८६ हा कोरोनाचा नवा व्हेरियंट असल्याने, त्याची लक्षणे वेगळी किंवा अधिक गंभीर असू शकतात. तथापि, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी काही लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असा सल्ला ‘सीडीसी’ने दिला आहे. सर्दी, डोकेदुखी, थकवा, सतत शिंका येणे, घसा खवखवणे, खोकला, वास घेण्याची क्षमता कमी होणे अशा स्वरूपाची कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणे असू शकतात.
कोरोनाच्या नव्या अवताराने बाधित ७ रुग्ण १९ ऑगस्ट २०२३ रोजी आढळले. त्यांच्यावर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.२.८६ याला पिरोला या नावाने ओळखला जात आहे. जीआय-एसएआयडी या जीनोम सिक्वेसिंग डेटाबेस तयार करणाऱ्या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार बीए.२.८६ मध्ये ३० पेक्षा जास्त उत्परिवर्तन आहेत.
ओमिक्रॉन, अल्फा आणि डेल्टा अशा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा बीए.२.८६ पूर्णपणे वेगळा आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या कोरोना व्हेरिएंटचा प्रकार अनेक देशांमध्ये पसरलेला आहे, तो किती वेगाने आणि केव्हा पसरणार याचा अंदाज कोणालाही नाही.