विश्लेषण / श्रीपाद सबनीस
लोकमान्यांच्या नावे असलेला पुरस्कार म्हणजे जणू ऐतिहासिक कोंदणच! आणि या पुरस्काराने गौरव होणे म्हणजे महद्भाग्यच!!

या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींचा दिमाखदार पद्धतीने (1 August) गौरव करण्यात आला. मात्र या वर्षीच्या सोहळ्याला आगळं राजकीय परिमाण लाभलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीने महाविकास आघाडीतच नव्हे, तर नव्यानेच अस्तित्वात आलेल्या ‘INDIA’ च्या गोटातही संभ्रमाचा कल्लोळ उठला.
अर्थातच ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ समोरील परिस्थिती आणि ‘आपण भाजपाच्या जवळ कधीही जाणार नाही’, अशी शरद पवार यांनीच अलीकडे मांडलेली राजकीय भूमिका यामुळे तो कल्लोळ माजला.

एकीकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना शरद पवार हे नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात का जात आहेत? आणि आता का गेले? यावरून चर्चेला पेव फुटले. समविचारी पक्ष-संघटनांनी तर शरद पवार यांच्या भूमिकेविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. कारण, ते स्वत: ज्या ‘INDIA’ या राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या आघाडीत सामील आहेत, त्या आघाडीनेच मोदींविरुद्धचा संघर्ष टोकाला नेला आहे.
याच आघाडीने मोदी आणि भाजपा लोकशाही संपवू इच्छितात, सामाजिक तेढ पसरवतात अशी भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर, असाच आक्षेप घेणाऱ्यांमध्ये ‘राष्ट्रवादी’ च्या शरद पवार गटातलेच काही जण आघाडीवर असतांनाही, शरद पवारांची भूमिका वेगळी का? असा प्रश्न अनेकांना पडला.
तसे पाहता शरद पवारांनी नेहमीच आपल्या राजकीय आणि वैचारिक प्रतिस्पर्ध्यांबाबत अनेकविध प्रसंगात लवचिकता दाखवली आहे. मात्र आजच्या घडीला विश्वासार्हतेविषयीचा एक संदेश शरद पवार (sharad pawar) यांनी दिला. ही बाब येथे अधोरेखित करावी लागेल. तथापि, राजकीय संस्कृतीचा आणि औचित्याचा मुद्दा असला तरीही, सद्यस्थितीत या कार्यक्रमातील हजेरीने शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा मुद्दा चर्चेत आणला, हे नाकारता येणार नाही.
टिळक पुरस्काराच्या मंचावर शरद पवार हे पंतप्रधान मोदींसोबत होते, हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचाच भाग होता. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपणास आठवत असेल कि, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे (Thackeray) एकमेकांवर टोकाची टीका करीत, तरीही त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जातात.
पाटणा, बंगळुरु असेल किंवा सप्टेंबरमध्ये मुंबईत होऊ घातलेली ‘INDIA’ ची बैठक असेल, मित्रपक्ष शरद पवार यांच्या मागे उभे राहिले, पण आता त्यांच्या संभ्रमात भर पडली असेल, हे नक्की.
दुसऱ्या बाजूला भाजपाशी हातमिळवणी केलेल्या बंडोबा आमदार-नेत्यांकडून शरद पवार यांना राजी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शरद पवारांसह ‘राष्ट्रवादी’ला भाजपाच्या जवळ नेण्याच्या अनुषंगाने नवा फॉर्म्युला तयार होत आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले, यातून काय संकेत मिळतो?
बंगळुरुच्या बैठकीला शरद पवार यांनी लावलेली हजेरी हा एक भाजपाला संदेश होता, असे म्हटले गेले. तर, आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांनी आपल्या पक्षाला, कार्यकर्त्यांना कोणता राजकीय संदेश दिला? संभ्रमाचा आणि विश्वासाचा प्रश्न मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही मनात आहे. शरद पवार काय करु इच्छित आहेत, याचा अंदाज त्यांनाही आलेला नाही. त्यातच ‘टिळक पुरस्कारा’च्या अराजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने भर पडली इतकेच!