कोळसा खाण घोटाळा प्रकरणात आज (२६ जुलै) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (CBI Special Court) राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांच्यासह इतर आरोपींना शिक्षा सुनावली.
विजय दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता दर्डांना ६ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. दर्डा यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आणि कोर्टाने या निकालावर स्थगिती दिली तर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
कोळसा खाण घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दोषी ठरवले होते. आज दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय, १५ लाखांचा दंडही ठोठावला आहे. तर, विजय दर्डा यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा आणि १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना देखील कोर्टाने चार वर्षांची शिक्षा आणि १५ लाखांचा दंड ठोठावला. जेएलडी कंपनी ही दर्डा यांच्याशी संबंधित आहे. त्याशिवाय, कोळसा खात्याचे माजी सचिव एच.सी. गुप्ता यांना तीन वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला हादरवून सोडणाऱ्या कोळसा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने १३ जुलै रोजी सात आरोपींना भादंवि कलम १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि भादंवि ४२० (फसवणूक) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार दोषी ठरवले होते.
छत्तीसगड कोळसा घोटाळ्यातील आरोपी तुरुंगात
छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.