मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना मंत्री मंडळातून डच्चू देण्याचा जवळपास निर्णय झाला असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात विस्तार
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्र व राज्य पातळीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात मंत्रिमंडळातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून पुन्हा मध्यरात्री २ च्या सुमारास महाराष्ट्रात परतले. त्यांच्या या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर व मंत्र्यांच्या फेरबदलावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला जात आहे.
केंद्रात शिवसेनेला मंत्रीपद
महाराष्ट्रानंतर केंद्रातील रालोआ सरकारमधील अकार्यक्षम मंत्र्यांनाही डच्चू मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील भाजपच्या २ अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागी शिवसेनेच्या २ चेहऱ्याना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात १ कॅबिनेट व १ राज्यमंत्रीपद असेल. या पदावर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय केंद्राने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोपवला आहे.
मिनिस्टर ऑफ कौन्सिलची बैठक
येत्या सोमवारी मिनिस्टर ऑफ कौन्सिलची बैठक राजधानी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीत मंत्र्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तपासली जाणार आहेत. या बैठकीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरविली जाणार आहे. तसेच या बैठकीनंतर काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.