एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ४८ सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ४६ दिवस होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरला न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सलामीचा सामना होणार आहे. या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होतील.
या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, भारताच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. हा सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत हा सामना खेळवला जाणार आहे.
१२ शहरांमध्ये सामने
अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम), बंगळुरू (एम चिन्नास्वामी स्टेडियम), चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम), दिल्ली (अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम), धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम), गुवाहाटी (आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम), हैदराबाद (राजीव गांधी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, उप्पल), कोलकाता (ईडन गार्डन), लखनौ (एकना क्रिकेट स्टेडियम), इंदूर (होळकर स्टेडियम), मुंबई (वानखेडे स्टेडियम) आणि राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम).
४६ दिवस चालणार स्पर्धा
ही स्पर्धा ४६ दिवस चालणार असून तीन बाद फेरीसह ४८ सामने खेळवले जाणार आहेत. भारत प्रथमच संपूर्ण विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी, भारताने शेजारील देशांसह या मेगा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
१० संघ सहभागी
यावेळी विश्वचषकात १० संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून उतरतील.