कमला हॅरिस, मोदी आणि समोसा कॉकस !
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकी संसदेला संबोधित केले. यावेळी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले, लोकांमध्ये असलेल्या समानतेच्या जोरावर अमेरिका अस्तित्व टिकवून आहे. जगभरातून आलेल्या लोकांना समान वागणूक देत, अमेरिकेने त्यांना आपल्या सोबत घेतले आहे.
अमेरिकेत भारतातून आलेले लाखो लोक आहेत. यांपैकी कित्येक लोक इथे संसदेत देखील बसले आहेत. विशेष म्हणजे, यांपैकीच एक माझ्या मागेही उभ्या आहेत, ज्यांनी खरंतर इतिहास रचला होता. पंतप्रधान मोदी कमला हॅरिस यांच्याबद्दल बोलत होते.
कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या अशा उप राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्या भारतीय वंशाच्या आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, की अमेरिकेच्या संसदेत हल्ली समोसा कॉकसचा प्रभाव भरपूर दिसून येतो. मला विश्वास आहे, की आता विविध भारतीय खाद्यपदार्थ देखील या संसदेत पहायला मिळतील.
असा बनला समोसा कॉकस…
अमेरिकेच्या संसदेतील भारतीय वंशाच्या खासदारांना गमतीने समोसा कॉकस (Samosa Caucus) म्हटले जाते. २०१६ साली झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत याची सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेत भारतीय वंशाचे काही लोक खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर हे लोक संसदेत कित्येक वेळा एकत्र बसलेले दिसत.
अमेरिकी प्रतिनिधी सभेचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी या काळात पहिल्यांदा या खासदारांच्या गटाला समोसा कॉकस असे नाव दिले होते. कमला हॅरिस या देखील या गटातील एक प्रमुख सदस्य होत्या. अमेरिकेच्या संसदेत भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या लक्षात यावी, यामुळे हे नाव दिल्याचे राजा कृष्णमूर्ती म्हणाले होते.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख करून केलेल्या कौतुकानंतर कमला हॅरिस हसू लागल्या. तर, संसदेतील अन्य खासदारांनी टाळ्या वाजवून मोदींच्या या कौतुकाला दाद दिली.