जैन उद्योग समुहातील जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शिवार भेट आणि पीक पाहणी कार्यक्रम सुरु आहे. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे.
या उपक्रमास मुदतवाढ देण्यात आली असून दिनांक २५ मार्च २०२३ पर्यंत हा उपक्रम सुरु राहील.
यात सर्वाधिक लक्षवेधी विषय हा पिकांसाठी सिंचन व्यवस्थापनाचा असून त्यासाठी ठिबक (Drip) व तुषार (Sprinkal) पद्धती समजून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. या पद्धतींचे तंत्र बदलले असून त्यात सुधारणा होत आहेत. तांत्रिक निकष बदलले आहेत. आता कृषीतज्ज्ञ दोन नळी वापरायचे सांगत आहेत.
पिंकांच्या वाढीपर्यंत ठिबक सिंचन योग्य असून पूर्ण वाढ झालेल्या पिकांसाठी वा फळ देणाऱ्या पिकांसाठी तुषार सिंचन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले जात आहे. झाडाच्या खोडाजवळ चारही बाजूने पडणाऱ्या सावलीत झाडांची मूळे असतात. त्याचा विस्तार लक्षात घेऊन सिंचन व्यवस्था असावी असे कृषितज्ज्ञ वारंवार सांगत आहेत.
सिंचन व्यवस्थेविषयी कृषितज्ज्ञ डी. एम. बऱ्हाटे म्हणाले, ‘केवळ ५ टक्के शेतकरी तांत्रिक निकष व पुरेपूर क्षमतेनुसार ठिबक वा तुषार सिंचन पद्धतींचा वापर करीत आहेत. काही शेतकरी तांत्रिक खर्च वाचविण्यासाठी सिंचन योजना अपुऱ्या तंत्र स्वरुपात वापरतात. काही शेतकरी नवतंत्रात देशी पद्धतींचा जुगाड करतात. त्यामुळे पाणी, खते, पोषके याचे नियोजने नेमकेपणाने होत नाही. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य होत नाही.
पाण्याचा निचरा होणारी शेतजमीन असेल तर त्यात गादी पद्धतीने पिकांची पेरणी-लागवड करून तुषार सिंचन पद्धतीचा वापर करीत जास्त घनतेची पिके घ्यावीत. काळी कसदार व पाणी पकडून ठेवणारी शेतजमीन असेल त्यात गादी पद्धतीे इतर पिकांची लागवड करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत जास्त घनतेची पिके घ्यावीत. अशा पिकांच्या सिंचनासाठी सध्या दोन नळ्यांची ठिबक पद्धती किंवा जवळ आणि दूरवर पाणी उडवू शकेल अशा तुषार पद्धतीची शिफारस केली जात आहे.
पीक वाढते तेव्हा त्याच्या खोडाच्या जवळपास ठिबक सिंचन हवे असते. मात्र पिकांची पूर्ण वाढ झाली आणि मुळांचा विस्तार झाल्यानंतर तुषार सिंचनाची गरज असते. पिकाला रोज पुरेसे पाणी हवे असते. ते सुद्धा वाफसा स्थितीत. अती पाणी देऊन शेतजमीनीत चिखल झाला तर मुळांचा विस्तार होत नाही. खते वेळेवर व पुरेशी देता येत नाहीत. हे कार्य जर व्यवस्थितपणे करायचे असेल तर सिंचन व्यवस्था परिपूर्ण व गुणवत्तेच्या तंत्रासह वापरणे आवश्यक असते.
सिंचन पद्धत कोणतीही वापरली तर त्यात अचूक वेळ, पुरेसे पाणी वा खत दिले जाणे आवश्यक आहे. म्हणून आधुिक शेतीत स्वयंचलित यंत्रणेवर (Automation System) वर सध्या भर देण्यात येत आहे. रिमोटचा वापर करीत आणि वेळापत्रकानुसार पाणी, खते देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उपयुक्त ठरते आहे. स्वयंचलित यंत्रणा मनुष्यबळाचा खर्च, विजेचा खर्च कमी करते.
@दिलीप तिवारी, जळगाव
@dilipktiwarijalgaon