करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ
३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु
करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ
शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे
मृत गायींना तातडीने रातोरात पुरले
कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी
कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत. या गायींना शिळे अन्न, टाकून दिलेल्या पोळ्या (चपात्या) तसेच अन्य खाद्य पदार्थातून विषबाधा झाल्याचे वृत्त आहे.

या लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले होते. या ठिकाणी पशु प्रदर्शन सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांना आणण्यात आले आहे.
या विषयी माहिती देताना पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठान म्हणाले, येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल ५० ते ५४ गायींचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली. तब्बल ३० गायी गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गायींच्या मृत्यूबाबत माहिती देण्याविषयी कणेरी मठाकडून लपवाछपवी केली जात आहे.
कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. यासाठी देशातून हजारो नागरिक येथे येत आहेत. मठावर भव्य अशी गायींची गोशाळा आहे. या गोशाळेतील गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने मठातील तब्बल ५० ते ५४ गायींचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत झालेल्या गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास पशुवैद्यकीय अधिकारी देखील तयार नाहीत. मृत गायींचे पोस्टमार्टम करून त्याचा तपास केला जाणार आहे.
३० गायी गंभीर
३० गायी गंभीर असून त्यांच्यावर गोशाळेमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, मठाकडून माहिती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असून करोडो रुपये खर्चून मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला या कारणामुळे गालबोट लागले आहे.
दरम्यान एका ठिकाणी हजारो भाकरी व चपात्यांचा ढीग लागला असल्याचे देखील दिसून येत आहे. अन्न वाया जाऊ नये याकरिता हे सर्व येथील गाईंना खाऊ घालण्यात येत आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी रात्रीपासून घडत असून मृत झालेल्या अनेक गाईंना पुरण्यात आले आहे.
कोल्हापुरातील कणेरी मठ येथे सुरू असलेल्या या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी लाखो कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी नागरिकांनी येथे हजेरी लावली. या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने रोज हजारो किलोचे जेवण वाया जात आहे. यामुळे यातील भाकरी, चपातीचे ठीक ठिकाणी ढिगारे तयार झाले असून हेच सर्व अन्न येथील पशुंना खाऊ घातले जात आहे. यामुळे कदाचित विषबाधा होऊन गायी दगावल्या असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.