मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी मोघे समर्थकांनी माजी खासदार रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन केली.
काँग्रेस पदाधिकारी असलेले प्रकाश मुगदिया, आर. एम. खान नायडू, सरदार महेंद्रसिंग, पेंटा रामा तलांडी, कैलाश राऊत, बंडू उल्लेवार, बाबूराव झाडे, इक्रम हुसैनी, एस. पृथ्वीपालसिंग गुलाठी, विजय बाहेकर, मनोज बागडे, घनश्याम आहाके, सुरेश कुमरे, प्रितम कावरे, अशोक बोरकर, भीमराव पेंदाम, गौस खान, प्रकाश मक्रमपुरे, सुनील निर्वाण, शाबाद खान आदींच्या स्वाक्षरींसह एक निवेदन चेन्नीथला यांना मुंबई येथे देण्यात आले.
भाजपमधून आलेल्या पटोले यांना चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ८ महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत, पण त्याचा पक्षाला फायदा झाला नाही. पटोले यांनी भाजपमधून आयात केलेले छोटू भोयर यांनी ऐनवेळी विधान परिषदेची निवडणूक लढण्यास असमर्थता व्यक्त केली व त्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले. याची चौकशी अद्यापही प्रदेश काँग्रेसकडे प्रलंबित आहे.
राज्यसभेच्या तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व त्यांचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून काँग्रेसनिष्ठ आहेत. असे असतानाही सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीचे निमित्त साधत पटोले यांनी थोरात यांचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला.
विदर्भ हा आदिवासीबहुल आहे. काँग्रेसकडे एकही आदिवासी खासदार नाही. अशात आदिवासी समाजाचा प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आला तर त्याचा राज्यातील प्रत्येक निवडणुकीत पक्षाला फायदा होईल. त्यामुळे पटोले यांना हटवून मोघे यांना संधी देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.