माद्रिद : स्पेनमध्ये आता कायद्यान्वये मासिक पाळीमध्ये महिलांना रजा मिळणार आहे. अशा स्वरूपाचा कायदा आणणारा स्पेन हा युरोपतला पहिला देश ठरला.
या कायद्याच्या बाजूने स्पॅनिश संसदेमध्ये १८५ तर विरोधात १५४ मते पडली. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदना सहन कराव्या लागतात, त्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेची गरज असते. शिवाय मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर करण्यचा उद्देश असल्याचे स्पेन सरकारने म्हटले आहे.
सध्या जपान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशांमध्ये महिलांना मासिक पाळीमध्ये वैद्यकीय रजा दिली जाते. या देशांच्या यादीमध्ये आता स्पेनचा समावेश झाला आहे. स्पेनच्या मंत्री इरेन मोटेरा यांनी सांगितले की, स्त्रीयांच्या हक्कांसाठी टाकलेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.
स्पॅनिश प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग सोसायटीच्या मते मासिक पाळी सुरु असलेल्या एक तृतियांश महिलांना मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. त्यामुळे महिलांना रजा मिळणे आवश्यक आहे. ही रजा किती दिवस मिळणार, हे डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार ठरवण्यात येणार आहे. याशिवाय इतर आरोग्यविषयक रजा ह्या सशुल्क रजेप्रमाणे किंवा डॉक्टरांच्या अहवालाप्रमाणे मिळणार आहेत.
या कायद्यानुसार अल्पवयीन मुलींना पालकांच्या परवानगीशिवाय गर्भपात करता येणार आहे. २०१५ मधील कायद्याच्या हे अगदी उलट आहे. युरोपामध्ये स्त्रीवादी संघटना हा दिवस ऐतिहासिक समजत आहेत. कारण महिलांच्या हक्कासाठी हे मोठे पाऊल आहे, असे म्हटले जात आहे.