शेती विषयक नवतंत्राशी संबंधित लेखमाला सुरु करीत असताना आनंद होत आहे. khabarbat.com च्या वाचकांना, विशेषतः शेतीची आवड असणाऱ्यांना श्री. दिलीप तिवारी नवतंत्राची सफर घडवून आणणार आहेत, हे उल्लेखनीय. या मालिकेतील पहिला लेख आज सादर करीत आहोत.

कृषी ज्ञान यात्रा – १ / दिलीप तिवारी
‘जैन’चे कृषी संशोधन शिवार खुले …

जैन उद्योग समुहांतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रयोग व नवतंत्र शोधशाळा उपलब्ध आहे. प्रयोगांचे परिणाम दर्शविणारे पिकांचे प्रात्यक्षिक शिवार आहेत. गेल्या तीन दशकात नवे वाण वा ऊती संवर्धित रोपे, लागवड वा रोपण पद्धती, अत्याधुनिक यंंत्र-तंत्राचा वापर, जलसिंचनाच्या ठिबक-तुषार या सुधारित पद्धती, द्रवरूप खते, पीक वाढीसाठी शेेडनेेट, ग्रीन हाऊस, पीक संरक्षणाचे तंत्र, उत्पादन वाढ, साठवणूक आणि विक्री या बाबत ठराविक पिकांसाठी मर्यादित शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पाहणी, तंत्रप्रदान व इतर सहकार्य जैन उद्योग समुह करीत आला आहे.
१ हजार शेतकऱ्याची भेट
गेल्या चार दिवसांपासून जैन उद्योग समुहाने कृषी संशोधनाचे शिवार शेतकऱ्यांसाठी स्थळ भेट, पाहणी, निरीक्षण, शंका निरसन आणि स्वीकृती यासाठी खुले केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत लगतच्या राज्यातील जवळपास १ हजार शेतकरी जैनच्या कृषी संशोधन शिवारात येत आहेत. ही एक प्रकारे ‘कृषीज्ञान यात्रा’ ठरली आहे.
शेतकरी वर्ग केळी, कांदा, फळझाडे, भाजीपाला, तृणधान्ये आदी पिकांचे नवतंत्र वापरून उत्पादन घेत असला तरी त्यात काही प्रमाणात पारंपारिक सवयी कायम आहेत. अशा स्थितीत कृषी विषयक नवतंत्राच्या शोधातून प्रात्यक्षिक शिवारात मिळणारे उत्पन्न आणि शेतकऱ्यांच्या शेत शिवारात मिळणारे उत्पन्न यात काही तफावत दिसत आहे. मोजकेच शेतकरी नवतंत्र परिपूर्ण वापरून वाढीव उत्पन्न घेत आहेत.
प्रगत नव तंत्राचा वापर अनिवार्य
दुसरीकडे शेत जमिनीचे प्रमाण झपाट्याने कमी होते आहे. अती खते, रसायने वापरामुळे जमिनीचा पोत खराब होऊन नापीक होत आहे. भाऊबंदकी हिस्सेदारीत वाटली जाणारी शेतजमीन एकर वरून भविष्यात स्क्वेअर फुटावर येईल. अशा स्थितीत कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी श्रमात अत्यंत प्रगत नवतंत्र वापरून अधिकाधिक उत्पन्न देणारी शेती करावी लागणार आहे.
कृषी संशोधन शिवार शेतकऱ्यांसाठी खुले
जैन उद्योग समुह याच विषयांवर सतत आणि अखंडपणे काम करीत आहे. अनेक कृषी संशोधक, अभ्यासकांनी शेतीचे नवतंत्र विकसित केले आहे. यांत्रिक शेतीचे अनेक पर्याय विकसित आहेत. त्यांचे प्रात्यक्षिक, परिणाम व वाढीव उत्पादन पाहणे, अनुभवणे यासाठी ‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार सर्व शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहे.
येत्या १५ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील कुठलेही व इतर राज्यातील शेतकरी ‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार पाहू शकतील. तेथील अभ्यासकांना प्रश्न व शंका विचारू शकतील …
मी स्वतः ‘जैन’ च्या या कृषीज्ञान यात्रेत सहभागी झालो. जे काही पाहिले-अनुभवले त्याविषयी आज हा परिचयात्मक लेख लिहिला.
उद्यापासून शेतीतील नवतंत्र व प्रात्यक्षिक या विषयी स्वतंत्र भाग … वाचत राहा… khabarbat.com