जालना : आपल्यापैकी प्रत्येकजण स्वप्न पाहत जगात असतो, तर काही स्वप्नात जगतात, तर काही जण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपड करीत असतात. एकंदरीत स्वप्न कोणाचाच पिच्छा सोडत नाहीत. एक मुलगा आणि बाप दोघेही आपल्या घोड्याच्या स्वप्नात मश्गुल होतात. तोच स्वप्नातला घोडा तुम्हाला भेटण्यासाठी लवकरच येत आहे, कधी ते पहा…

जालना जिल्ह्याचा भूमिपुत्र तसेच बहुचर्चित ‘तानाजी’ फेम चित्रपटात अफलातून भूमिका करणाऱ्या कैलास वाघमारे या मराठी अभिनेत्याचा ‘घोडा’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे.
‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या लोकप्रिय नाटकातून नाट्यक्षेत्रात प्रवेश केलेल्या जालना जिल्ह्यातील चांधई ठोंबरी येथील कैलास वाघमारे याने ‘ मनातल्या उन्हात’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. पुढे ‘ म्हादू’ ड्राय डे, हाफ टिकिट, भिकारी या चित्रपटातही त्याने अभिनेता म्हणून काम केले. यानंतर अनेक लघुपटाद्वारे त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘तानाजी’ या चित्रपटात चुलत्याची व्यक्तीरेखा साकारली होती.
घोडा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत असून त्याचे दिग्दर्शन टी. महेश यांनी केले आहे.
बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसा घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील काय धडपड करतात त्याची गोष्ट घोडा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
स्वप्न पाहणे, ती पूर्ण करण्यासाठी धडपड, त्या दरम्यान माणसाच्या वेगवेगळ्या वृत्ती अनुभवास येणे असा प्रवास असलेला घोडा हा चित्रपट असून टी. महेश फिल्म्सच्या टी. महेश आणि अनिल वणवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
जमीर अत्तार यांनी कथा आणि गीतलेखन, महेशकुमार मुंजाळे आणि निलेश महिगावकर यांनी पटकथा लेखन, संवादलेखन निलेश महिगावकर, योगेश एम. कोळी यांनी छायांकन केले असून रोहन पाटील यांनी संकलन केले आहे. अभिनेता कैलास वाघमारे, अर्चना खारतुडे, दिलीप धनावडे, राहुल बेलापूर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
‘घोडा’मध्ये दमदार अभिनय केलेल्या कैलास वाघमारे यास महाराष्ट्र राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले आहे, हे विशेष.