नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. महादेवाच्या पिंडीवर जमा झालेला तो बर्फ म्हणजे बनाव होता असे उघडकीस आले आहे. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
र्त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीभोवती बर्फ जमा झाल्याचे सांगत सुशांत तुंगार या पूजाऱ्याने सोशल मीडियावर २०२२ साली व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर या व्हिडियोची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही झाली.
त्र्यंबकेश्वर येथील तापमानात बर्फ कसा तयार झाला यावरून भाविकांनी संशय व्यक्त केला होता. साधारणपणे ३० जून २०२२ च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली होती, यानंतर वस्तुस्थिती आता इतक्या दिवसांनंतर सर्वांसमोर आली आहे.
या सत्यशोधन करण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत मंदीरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली. त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनी पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे उघड झाले.
अमरनाथप्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.