औरंगाबाद : तब्बल सात वर्षानंतर पुन्हा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची मेजवानी रसिकांना चाखायला मिळणार आहे. यंदा २५, २६ आणि २७ फेब्रुवारी असे तीन दिवस सोनेरी महल येथे हा महोत्सव रंगणार असून, या महोत्सवात उस्ताद राशिद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमणी, विजय घाटे, संगिता मुजुमदार आणि शंकर महादेवन असे दिग्गज कला सादर करणार आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १९८५ मध्ये वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली. सदर महोत्सवाचे रूपांतर २००२ मध्ये वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले.
मागच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना या कारणाने या महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यंदा हा महोत्सव होत आहे. २५, २६ आणि २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय आणि उपशास्रीय, गायन ,शास्त्रीय नृत्य सादर केले जाणार आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी माहिती दिली.
वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होईल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे हे कार्यक्रमाचे सह अध्यक्ष असतील.
हे सर्व कार्यक्रम रात्री ८ ते ९.३० दरम्यान होतील.
तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com