वॉशिंग्टन : अमेरिकन कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे सत्र अव्याहतपणे सुरु आहे. अनेक दिग्गज कंपन्यांसोबत आता वॉल्ट डिस्ने कंपनीने ७ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच केलेल्या तिमाही कमाईच्या घोषणेनंतर लगेचच हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या कर्मचारी कपातीच्या रांगेत आता वॉल्ट डिस्नेचाही समावेश झाला आहे. कंपनीकडून सात हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
डिस्नेने संपूर्ण कंपनीतील खर्च कमी करण्यासाठी कंपनीने ७,००० कामगारांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. कामाच्या संरचनेची पुनर्रचना करण्याची आणि खर्च कमी करण्यासाठी नोकर्या कमी करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सीईओ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बॉब इगर यांचा हा पहिला मोठा निर्णय मानला जात आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती.
डिस्नेच्या २०२१ च्या वार्षिक अहवालानुसार, जगभरात कंपनीचे १,९०,००० कर्मचारी आहेत. त्यापैकी ८० टक्के पूर्णवेळ आहेत. मात्र, कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतर ही संख्या ३.६ टक्क्यांनी कमी होईल.