मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या पतधोरणानुसार महागाईचा विळखा आणखी घट्ट झाला असून गृह आणि वाहन कर्जावरील व्याज दरात वाढ होत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली.
देशातील केंद्रीय बँकेची पतधोरण बैठक सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नवीन वर्षातील बँकेचे पहिले पतधोरण जाहीर केले.
तीन दिवस चाललेल्या बैठकीतील निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (रेपो रेट) ०.२५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली. परिणामी केंद्रीय बँकेचा व्याजदर ६.५% वर पोहोचला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कर्जदारांना हा आणखी एक धक्का आहे.
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर करत शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि महागाईच्या आकडेवारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय पण जागतिक आव्हानानुसार निर्णय घ्यावे लागतील.
मागील वार्षिक विक्रमी महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग सलग पाच वेळा वाढ केली. रेपो दर ६.२५ टक्क्यांवर पोहोचला. तर यंदाही आरबीआयने दरवाढ कायम ठेवली असून रेपो रेटमध्ये २५ बेसिक पॉइंट्सची वाढ जाहीर केली.
आता अन्य बँका आणि वित्तीय संस्था देखील व्याजदरात सुधारणा करतील, ज्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. त्याच वेळी, ज्या कर्जदारांनी आधीच कर्ज घेतले आहे त्यांना महागड्या EMI ला तोंड द्यावे लागेल. MPC चे ६ पैकी चार सदस्य दरवाढीच्या बाजूने राहिले.
रेपो रेट मध्ये गेल्या वर्षी ५ पट वाढ
रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या वर्षी रेपो दरात सलग पाच वेळा वाढ केली. मागील एका वर्षात रेपो रेटमध्ये एकूण २.२५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. गेल्या वेळी डिसेंबर २०२२ मध्ये RBI ने व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आणि ६.२४ टक्के केला. रेपो दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी कर्ज आणि ईएमआय महाग झाले आहेत.
महागाईचा दर ६.५%
यंदाच्या २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात महागाई ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यंदा पाऊस सर्वसामान्य राहिला तर CPI महागाई ५.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असेही शक्तिकांत दास यांनी सांगितले.
जीडीपी वाढीचा दर ६.४%
गव्हर्नर शक्तीकांत दास आर्थिक वाढ, जीडीपी आणि महागाईवर भाष्य करतांना म्हणाले, जीडीपी वाढीचा दर हा ६.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यांपैकी पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के तर चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहिल.