विश्लेषण / श्रीपाद सबनीस
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील अशी चिन्हे दिसत नाहीत.
विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. तोच आता बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार का? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया देत म्हटले, आम्ही त्यांना सन्मानपूर्वक सामावून घेऊ.
कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत. आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपत प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देतो, असे बावनकुळे यांनी सांगितले. तात्पर्य असे कि, बाळासाहेब थोरातांना BJP ची दारे खुली आहेत.
बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे वाटत नाही.
बाळासाहेब थोरात यांनी नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते पक्षात दुखावत असतील तर काँग्रेसला खरोखरच आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये दुफळी किंवा फूट पडल्याचे बोलले जात होते. राज्याचे पक्षाध्यक्षपद सोडणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी आज विधिमंडळ पक्षनेते पदाचा अचानक राजीनामा दिला.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून नाराजीचे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले. पक्षात आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला. थोरात यांनी ज्या दिवशी नाराजीचे पत्र लिहिले, त्याच दिवशी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा थेट काँग्रेस हायकमांडकडे दिला. या प्रकरणी काँग्रेस हायकमांड थोरतांची मनधरणी करणार की नाशिक पदवीधर मतदारसंघातील घोळाला जबाबदार ठरवून त्यांना पदावरून हटवणार, हे पहावयाचे.
नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत थोरात यांची निष्क्रियता तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात आलेले अपयश यामुळे थोरात यांचे विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत होते. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर त्यांच्याकडे पक्षनेते पद ठेवायचे का? यावर श्रेष्ठींचा निर्णय होण्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. एकंदरीत यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
याप्रकरणी नाना पटोले यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही हे दुर्दैवी असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पुरेसा संवाद होत नाही, हे नाना पटोले यांच्या विधानातून अधोरेखित झालेच आहे.
काँग्रेसजनांमधील मतभेद विस्तारत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले नानांनी काय भूमिका घेतली? हा मुद्धा अनुत्तरित राहतो. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेब थोरात कदाचित पक्ष सोडून जाणार नाहीत, परंतु पक्षांतर्गत मतभेदाला दिलजमाईचे कोंदण लागणार का? हा खरा प्रश्न आहे.
( संपादक, khabarbat.com )