लंडन : चहासोबत बॉरबॉन किंवा डायजेस्टीव्ह खाणे हे जणू ब्रिटिशांच्या जीवनाचा भाग आहे. पण तिथल्या तरुणांना आता गोड पदार्थांऐवजी नमकीन स्नॅक्स खाणे जास्त आवडू लागले आहे. त्यामुळे नव्या सर्वेक्षणानुसार तेथील तरुण वर्ग समोसा आणि तत्सम स्नॅक्सला प्राधान्य देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

युनायटेड किंगडम टी अँड इन्फ्युशन्स असोसिएशन (UKTIA) ने १००० लोकांचा सर्व्हे केला. या सर्वेक्षणानुसार, १८ ते २९ वयोगटातील दहापैकी एकास ग्रॅनोला बार हे चहाचे स्नॅक म्हणून आवडते. हे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांंपेक्षा दुप्पट आहे. तर ब्रिटनमध्ये भारतीय नमकीन स्नॅक्स समोसा आवडण्याचे प्रमाण तरुणांमध्ये ८ ट्क्के आहे. पण ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकही नाही.
ग्रॅनोला बार किंवा समोसा यामध्ये आत स्टफींग असते, म्हणजे ते आतून भरलेले असते, त्यामुळे ते खाऊन पोट भरल्याची जाणीव होत असल्याने या पदार्थांना पसंती मिळत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तरुणांना दाणेदार, मसालेदार पदार्थ आवडतात. एकंदरीत समोश्याला ब्रिटनमध्ये अच्छे दिन येत आहेत.