औरंगाबाद : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील टपाल खात्यात नोकर भरतीची जाहिरात अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली. टपाल खात्याच्या वेबसाईट वरून १० वी उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिली गेली आहे. मात्र यातील त्रुटीमुळे महाराष्ट्रातील शेकडो उमेदवारांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

टपाल खात्यात पोस्ट मास्तर, सहायक पोस्ट मास्तर, ग्रामीण डाक सेवक या ४० हजार पेक्षाही अधिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरावयाची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. या अर्जात भरावयाच्या शैक्षणिक तपशिलाच्या फॉरमॅट मध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळे उमेदवारांना पूर्ण अर्ज भरता येत नाही. तपशील अर्धवट राहात असल्यामुळे अर्ज सबमिट होत नाही. त्यामुळे पात्र असूनही इच्छूक उमेदवारांची निराशा होत आहे.
या अर्जातील शैक्षणिक तपशिलाच्या माहितीत अनेक विषय आहेत, मात्र mechanical engineering v2 हा विषय अंतर्भूत केलेला नाही. त्यामुळे हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या अर्जाचा फॉरमॅट बनवण्याचे काम TCS कंपनीने केले आहे. TCS ने तात्काळ त्यात दुरुस्ती करावी, आणि टपाल खात्याने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.