औरंगाबाद : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील रब्बीचे पीक अडचणीत आले आहे. विशेषत: राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर मावा किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
थंडीसोबत धुके वाढले….
राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडी, पावसासोबत धुक्याचे प्रमाणही वाढत असल्याने रब्बी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.