न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन…
का आणि केंव्हा थांबता आलं पाहिजे, हे पुढील कित्येक वर्षे लक्षात राहील असं, विलक्षण उदाहरण आहे !
कोरोना महामारीच्या काळात सर्वात कडक नियम करून साऱ्या न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचा आत्ताचा अद्भुत निर्णय समस्त लोकांना प्रभावित करणारा ठरावा, याच साठी हा लेखन प्रपंच !
व्यक्तिशः मला प्रभावित केलेली आणि हयात असलेल्या काही व्यक्तिमत्वांपैकी जसिंडा या एक. अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जसिंडा शाळेपासूनच लीडरशिप घेऊन होत्या. म्हणूनच त्या वयाच्या २८ व्या वर्षी न्यूझीलंडच्या खासदार झाल्या. मजुर पक्षाकडून निवडून येताना त्यांचा कामातला बारकावा आणि राष्ट्रीय धोरणं यामुळे त्या केवळ न्यूझीलंडच्या नव्हे तर जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या.
जगात सर्वात जास्त ताकतीने महामारी कोणी हाताळली असेल तर जसिंडा यांनी हे छातीठोकपणे मी सांगेन. त्यांच्या दोन वेळच्या पंतप्रधान पदाच्या काळात केवळ महामारी नव्हे तर अनेक बाबी त्यांनी हाताळल्या आहेत.
महिला, तरुण आणि लहान मुले यांच्याबाबत त्यांनी नवीन कायदे करून देशाला वेगळी दिशा दिली. न्यूझीलंडला धर्मवाद शिवला नव्हता तेंव्हा मशिदीत बॉम्बस्फोट होऊन शेकडो लोक मारले गेले. न्यूझीलंडला हा प्रकार नवा आणि धक्कादायक होता. मुस्लिम समाज अस्थिर होता तेंव्हा आयुष्य स्कर्ट – मिडी मध्ये घालवलेल्या जसिंडा अर्डन हिजाब घालून नातेवाईकांना भेटल्या आणि एका कृतीत त्यांनी देशातील अस्थिरता फुंकून टाकली.
साऱ्या जगात पर्यावरण बदलाबाबत प्रचंड काम होत आहे. प्रत्येक देश याला आपली राष्ट्रीय समस्या असल्याचे सांगून आत्ता धडपडू लागला आहे तर जसिंडा यांनी “झिरो कार्बन” पॉलिसी प्रत्यक्ष अंमलात आणलीय.
जसिंडाचा नवरा टीव्ही कलाकार असून त्यांना मुलगी झाली तेंव्हा जसिंडाला देशाकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने तिच्या नवऱ्याने राजीनामा दिला आणि घर सांभाळलं.
जसिंडा सर्वात तरुण पंतप्रधान आहे म्हणजेच त्या आत्ताही त्या तरुणपणातच आहेत. तरीही त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणतंच धक्कादायक कारण नाही, कोणता आरोप नाही, गुन्हा नाही, कोणी थांबवलं नाही, पक्षाने तसा निर्णय घेतला नाही तरी…..
तरी जसिंडा अर्डन थांबणार आहेत. देशासाठी जे दिलं ते पूर्ण दिलं.
आता तितकीच तडफ नाही. तितका जोश नाही. नवीन कोणी येईल तितक्याच ताकतीने काम करेल. जे देईल ते माझ्यासारखंच पूर्णपणे देईल म्हणून मला थांबायचे आहे.
जसिंडा पुन्हा निवडून येणारच आहेत,
पुन्हा त्यांच्याच मजूर पक्ष सत्तेवर येणार आहे. आत्ता त्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. न्यूझीलंडच्या सर्वात आवडत्या व्यक्ती आहेत…… अश्या वेळी जसिंडा अर्डन थांबणार आहेत.
सगळं वाचून झालं असेल, समजले असेल तर आता थोडं स्वतः कडे पाहुयांत. पद, प्रतिष्ठा, पैसा, वय यांचा आपलाही थोडा मेळ घालूयांत.
याचा अर्थ असा नव्हे की लग्गेच काम थांबवू, निवांत राहू, वानप्रस्थाश्रम डोक्यात आणू.
जसिंडा यांनी काम थांबवलेले नाही,
देशभक्ती कमी केलेली नाही. उलट त्या अधिक काम करण्याची ग्वाही देत आहेत.
“अधिक कार्यरत राहण्यासाठी थांबावे”
हा जागतिक मंत्र देणाऱ्या जसिंडा अर्डन तुम्हाला सलाम !
– दीपक प्रभावळकर, सातारा.
9325403232/9527403232