khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

TATA च्या मॅरेथॉनमध्ये धावणार महिला सरपंच !

टाटा मुंबई मॅरेथॉन – २०२३

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला सरपंच व अन्य गाव कारभारणी १५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. पंचायतींमधील महिला नेतृत्व देशाच्या आर्थिक राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत गाव खेड्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन धावणार आहेत. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्भूत “ड्रीम रन” ठरणार आहे. गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी RSCD आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारी “ईशाद” (ISHAD) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून महिला सरपंचांचे हे स्वप्न साकार होणार आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण २० सरपंच व नेतृत्वशील महिला धावणार आहेत. त्यांची नावे अशी : सीमा पाचंगे, वर्षा मिडगुले ,प्रणया टेमकर, अर्चना पवार, शारदा गायधने , ऊमा माळी, अर्चना कांबळे, शर्मिला रामटेके, संगिता वेंदे , अर्चना जतकर, रत्नमाला वैद्य, हर्षदा वाळके, मालती सगणे, सुनंदा मांदळे, सुरैय्या पठाण, नंदा गायकवाड, माया सोनागोती, समिना शेख, प्रज्ञा आवाडे आणि मयुरी लाड.

काही नेतृत्वशील महिलांचा अल्प परिचय :

मालती सगणे- चंद्रपूर तालुक्यातील 10 गावांमध्ये श्रीमती सगणे यांच्या पुढाकाराने बचतगट स्थापन करण्यात आले. त्यातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. गेली २२ वर्षे त्या महिला सक्षमीकरण आणि गाव विकासासाठी झटत आहेत. पंचायतराज या विषयात त्या तज्ज्ञ असून, नवनियुक्त लोकप्रतिनिधींना त्या प्रशिक्षणही देतात. विविध समित्यांवरही त्या कार्यरत आहेत. त्यांना उत्तम जिल्हा संघटिका आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

रत्नमाला वैद्य – महिला सक्षमीकरण आणि महिला हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या अनेक वर्षे त्या अग्रेसर भूमिका निभावत आहेत. विविध समित्या आणि मंडळांच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी २०१९ मध्ये लंडन येथे ‘भारतातील महिलांची राजकीय स्थिती’ यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. लोकसेवक समाजरत्न, सखी गौरव आणि लोकमत सखी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


अर्चना जतकर – संघटन बांधणी, उत्तम संवाद कौशल्य आणि प्रभावी लेखन ही अर्चना जतकर यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. जीपीडीपी आणि क्रांतिज्योती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उत्तम प्रशिक्षिका म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांना अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट सरपंच पुरस्कार, कुसुमताई लेले पुरस्कार आणि महिला राजसत्ता आंदोलन उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सुनंदा मांदळे – एकल व परितक्त्या महिलांना मदतीचा हात देतांना गावाच्या विकासातही योगदान देणारे नेतृत्व म्हणून श्रीमती मांदळे पंचक्रोशीत परिचित आहेत. पंचायतराज क्षेत्रात गेली अनेक वर्षे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. संघटन बांधणी आणि शासकीय यंत्रणेचा गावाच्या उन्नतीसाठी वापर करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यांना आदर्श कार्यकर्ती पुरस्कार व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा युवा कार्यकर्ती पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

नंदा गायकवाड – संघटन बांधणी, प्रशिक्षण, कविता लेखन, संवाद, कौशल्य इत्यादींच्या जोरावर श्रीमती गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी त्यांचा सावित्रीबाई ग्राम मंगल पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार व कला संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हर्षदा वाळके – एमए- बीएड पर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रीमती वाळके यांचा गृहिणी ते पंचायत समिती सदस्यपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेंतर्गत पंचायत महिला शक्ती अभियानामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून त्या कार्यरत आहेत. जीपीडीपी आणि क्रांतिज्योती प्रशिक्षण कार्यक्रमातही त्या मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.

सुरैय्या पठाण – प्रभावी संवाद कौशल्य आणि प्रशिक्षण देण्याची उत्कृष्ट हातोटी ही श्रीमती पठाण यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. राज्य शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्या प्रशिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सावित्री अकादमीच्या जिल्हा समन्वयक व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सदस्या म्हणून त्या आपली भूमिका निभावत आहेत.

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या या महिला सरपंचांचा अनुभव महाराष्ट्रातील अन्य महिला सरपंच व ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी प्रेरणादायी असेल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like