औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत.

महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन करुनही त्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. राज्यात सत्तातरानंतरही फारसा काही बदल झालेला दिसत नव्हता. पगार वाढ सोडा वेळेवर पगार होत नसल्याने एसटी कर्मचारी नाराज होते.
एसटी कर्मचाऱ्यांना १२ जानेवारी उलटून गेल्यानंतरही वेतन मिळाले नव्हते. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी तसा आरोप केला होता. राज्य सरकारकडून न्यायालयात ७ तारखेदरम्यान पगार होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अर्थ मंत्रालयाकडून पगारासाठी निधी दिला जात नसल्याचे बर्गे म्हणाले होते. मात्र आज (शुक्रवार) राज्य सरकारने खऱ्या अर्थाने वेतनाचा तिळगूळ देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केले आहे.