सौदी अरेबिया : २०२३ मध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी देणारा मोठा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. यावर्षीच्या हज यात्रेकरूंच्या संख्येवरील मर्यादा रद्द करून अधिक लोक यात्रेला जाण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर सौदीने वयोमर्यादाही हटवली आहे. म्हणजेच आता कोरोना पूर्वीप्रमाणेच हज होणार आहे.
यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्या लोकांची संख्या कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल आणि या वर्षी हज यात्रेकरूंसाठी कोणतीही वयोमर्यादा नसेल, असे हज आणि उमराह मंत्री तौफिक अल-रबिया यांनी जाहीर केले.
२०१९ या साली सुमारे २५ लाख लोक हजसाठी गेले होते. यानंतर कोविडमुळे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या कमी झाली.
अलीकडेच ५ जानेवारी रोजी, सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने सांगितले की, स्थानिक रहिवाशांसाठी हज पॅकेजच्या चार श्रेणी उपलब्ध असतील. ज्यांना हजला जायचे आहे ते जुलैच्या मध्यापर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी वैध राष्ट्रीय किंवा निवासी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यात्रेकरूंकडे COVID-19 आणि सीझनल इन्फ्लूएंझा लसीकरणाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
भारतीय यात्रेकरूला लागणारे शुल्क :
२०१९ च्या आकडेवारीवर नजर टाकली तर एका हज यात्रेकरूला २ लाख ३६ हजार रुपये खर्च करावा लागला होता, तर २०२२ मध्ये एका यात्रेकरूला सुमारे ४ लाख रुपये खर्च करावा लागला होता. खरे तर सौदी अरेबिया सरकारने हजवरील कर १५ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.
वास्तविक, भारतातील विविध शहरांतून हजला जाणार्या यात्रेकरूंना त्या शहरानुसार खर्च करावा लागणार आहे. २०२२ च्या हज यात्रेसाठी हज इंडिया कमिटीने निश्चित केलेले शुल्क पुढीलप्रमाणे आहे…. मुंबई – ३,७६,१५०, अहमदाबाद – ३,७८,१००, कोचीन – ३,८४,२००, दिल्ली -३,८८,८००, हैदराबाद – ३,८९,४५०, लखनौ – ३,९०,३५०, बंगळुरु -३,९९,०५०, कोलकाता – ४,१४,२००, श्रीनगर – ४,२३,०००, गुवाहाटी – ४,३९,५००