इस्लामाबाद I कोरोना नंतरच्या काळात साऱ्या जगातील स्थिती सुधारत असताना मात्र पाकिस्तान सतत डबघाईला जात आहे.

पाकिस्तानातील नागरिकांची दोन घास अन्नासाठी मारामार सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य नागरीकांची जगण्यासाठी ससेहोलपट सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य नाही.
महागाईची स्थिती चिंताजनक : शाहबाज शरीफ सरकारकडून गरिबांना कोणतीही मोठी मदत मिळत नाही. पाकिस्तानातील अन्नधान्य महागाईत सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: २०२२ साली आलेल्या महापुरानंतर अन्नधान्य महागाईची स्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान इतर देशांकडे मदतीची मागणी करत आहे. लष्करप्रमुख आसिम मुनीर सध्या सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत.
पाकिस्तानात गहू देखील महागले आहे. पिठाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. गोर – गरिबांना भाकरी मिळणेही मुश्किल झाले आहे. मात्र पाकिस्तानचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे कोणतेही संकट नसल्याचे पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. पुरामुळे गव्हाच्या पिकाचे जास्त नुकसान झाले नाही असे त्यांचे मत आहे.
पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर : एकीकडे पाकिस्तानवर आधीच कर्जाचा मोठा डोंगर आहे, दुसऱ्या बाजूला आर्थिक बाबतीत पाकीस्तानचे सुस्तावलेले धोरण आणि राजकीय अस्थिरता लक्षात घेता कोणीही पाकिस्तानच्या मदतीला धावून येत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील पाकिस्तानच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे पाकिस्तान आता श्रीलंकेप्रमाणे दिवाळखोरीच्या वाटेवर जात आहे.
गॅस सिलेंडर १०००, चिकन ६५० रुपये किलो : ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्या माहितीनुसार रावळपिंडीच्या बाजारपेठेत पिठाची किंमत १५० रुपये किलोवर पोहोचली आहे. १५ किलो पिठाची पोती २ हजार २५० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लाहोरमध्ये पिठाची किंमत १४५ रुपये किलो आहे. इतर शहरांमध्येही अशीच परिस्थिती आहे. याव्यतिरिक्त चिकन ६५० रुपये किलो, गॅस सिलेंडर १०००, साखर व तुपाच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे.
लॉकडाऊनसारखी स्थिती : पाकिस्तानचे अधिकारी या परिस्थितीवर मात मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विजेचा कमी वापर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तान सरकारने देशातील बाजार साडेआठपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. यामध्ये हॉटेलचा देखील समावेश आहे. तसेच मॉल आणि मंगल कार्यालये रात्री १० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.