नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.

देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला. केंद्राने यासंदर्भात राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली. बिहारमध्ये खराब हवामानामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. बिहारपाठोपाठ महाराष्ट्र आणि ओडिशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आली.
२०२२ मधील जानेवारी व फेब्रुवारी महिना सोडला तर वर्षातील उर्वरित १० महिन्यांमध्ये देशात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवण्यात आले. २०२२ हे वर्ष पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदवण्यात आले आहे. जागतिक पातळीवर हे वर्ष पाचवे अथवा सहावे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. जागतिक हवामान विज्ञान विभाग (डब्ल्यूएमओ) एप्रिल महिन्यातील त्यांच्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट’ या अहवालात याचा उल्लेख करण्याची शक्यता आहे.
गतवर्षी वादळ-वारे तसेच वीज पडल्याने सर्वाधिक १ हजार २८५ लोकांचा मृत्यू झाला. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या तुलनेत ५८% एवढे आहे. पुर तसेच अतिवृष्टीमुळे ८३५, बर्फवृष्टीमुळे ३७ तसेच उष्णतेच्या लाटेमुळे ३०, धूळीच्या वादळामुळे २२ लोकांना प्राण गमवावे लागले. वादळ-वारे तसेच वीज पडल्याने एकट्या बिहारमध्ये ४१५ लोकांचा मृत्यू झाला. तर,ओडिशात १६८, झारखंडमध्ये १२२, मध्य प्रदेशात ११६, उत्तर प्रदेशात ८१, राजस्थानमध्ये ७८, महाराष्ट्रात ६४ तर आसामध्ये ५८ नागरिकांचा मृत्यू झाला. एकंदरीत बिहार ४१८, आसाम २५७, उत्तर प्रदेश २०१ तसेच महाराष्ट्रात १९४ मृत्यूची नोंद घेण्यात आली.