औरंगाबाद I देशातील सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम या जानेवारीच्या महिनाभरात जाणवू शकतो. आंतराष्ट्रीय बाजारात अनेक ठिकाणी ४ जानेवारीपर्यंत व्यवहार कदाचित बंद असतील. मात्र सुट्ट्या संपल्यानंतर भारतीय सोयापेंड आणि सोयाबीनला मागणी वाढणार आणि सोयाबीनला सोन्यासारखा भाव मिळेल, असा अंदाज सोयाबीन मार्केटमधील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात चढ – उतार होत होते. मात्र आठवड्याच्या शेवटी दरात वाढ पाहायला मिळाली. परंतु, देशातील सोयाबीन बाजार एका भाव पातळीवर ठाण मांडून होता. येत्या आठवड्यात सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. संपलेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली. अर्जेंटीनातील दुष्काळी स्थिती, चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता आणि खाद्यतेल दरवाढीचा आधार सोयाबीनच्या दर वाढीला मिळाला आहे.
सोयाबीनचा बाजार १४.८४ डॉलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला होता. नाताळच्या सुट्ट्यांनंतर बाजार सुरु झाल्याने चांगला आधार पाहायला मिळाला. रुपयात हा दर ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल होता. त्यानंतर आठवडाभर सोयाबीन दरात चढ उतार होत राहीले. सोयाबीनला उच्चांकी १५.३४ डॉलरचा दर मिळाला. रुपयात हा दर ४ हजार ७०० रुपये होतो. मात्र या दरावर सोयाबीन जास्त काळ स्थिरावले नाही. नवीन वर्षाआधी बाजार बंद होताना म्हणजेच शुक्रवारी दर १५.२४ डॉलरवर पोहचला. रुपयात हा दर ४ हजार ६७० रुपये होतो. मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर हा बाजार बंद झाला होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दारात क्विंटलमागे १२० रुपयांची सुधारणा झाली.
आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत
देशांतर्गत बाजारात सोयाबीन दर मात्र स्थिर होते. काही बाजार समित्यांत चढ उतार पाहायला मिळाले. मात्र हे प्रमाण खूपच कमी होते. आठवड्याच्या शेवटी बाजार सुधारण्याची शक्यताही निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत असूनही देशातील दरपातळी स्थिर होती. आठवडाभर देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर होते.