मुंबई I कॉपी पेस्टच्या झोलझाल मध्ये अभिनेत्री रवीना टंडन पुरती अडकली खरी मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याची मिळालेली आयती संधी वाया घालवली नाही. नववर्षांरंभ दिनी तिने तज्ञ गणितीचा आविर्भाव आणायचा प्रयत्न केला खरा, परंतु शहानिशा न करण्याचा सोस तिला नडला.
बॉलीवूड अभिनेत्री रविना ही नेहमीच हटके पोस्ट आणि स्टाईलसाठी चर्चेत असणारी एक सेलिब्रेटी आहे. मात्र नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि रविनाने शेयर केलेली ‘ती’ पोस्ट आता नेटकऱ्यांच्या डोळ्यात खुपली. इतकेच नव्हे तर तिला नेटकऱ्यांनी कोंडीत पकडले. तिची चांगलीच कानउघाडणी देखील केली आहे. तिने एक फॉरवर्ड व्हाट्सअप मेसेजचा दाखला देत नेटकऱ्यांना गणिताचा धडा दिला; जो नेटकऱ्याना आवडला नाही.
रविनाने ट्विटरवरुन ‘ती’ पोस्ट शेयर केली. त्यावरुन अनेकांना तर हसू आवरले नाही. आपल्या पोस्टमध्ये रविना म्हणते की, आज प्रत्येकाचे वय हे २०२२ इतके आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज जगातील सगळ्यांचे वय हे सारखेच आहे, आणि असे हजार वर्षातून होते. तुमचे वय+ तुमची जन्मतारीख= २०२२ हे इतकं भन्नाट आहे की त्याचा शोध गणितज्ञांना लागलेला नाही. मुळात इथे २०२२ ऐवजी २०२३ असे असते तर याच रवीनाचे गणिती ज्ञान कदाचित अगाध ठरले असते.