औरंगाबाद I शिवसेना, NCP, काँग्रेस, BJP सहित सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करीत आहेत. AIMIM ने देखील या लढ्यात उडी घेतली आहे. असा दावा करीत खा. इम्तियाज जलील यांनी MIDC च्या Land Conversion घोटाळ्याची सर्वंकष चौकशीची मागणी केली. मी तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. मात्र संबंधित प्रशासन व्यवस्था दिरंगाई करीत आहे, या घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर येऊ दिले जात नसेल तर ‘भ्रष्टाचार जिंदाबाद’ असेच म्हणावे लागेल. असे सुचवत विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा आम्ही जनतेला पटवून देऊ असा इशारा दिला.

एकीकडे महाराष्ट्र मंत्री मंडळातील चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा Land Conversion घोटाळा केल्याचा आरोप केला. तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लँड कन्वर्जनच्या नावाखाली औरंगाबादच्या MIDC मधील ५२ प्लॉट रूपांतरीत केल्याचे ते म्हणाले. औरंगाबादसह नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई सोबतच राज्यातील अन्य MIDC मधील भूखंडाचे रूपांतरण करण्यास त्यांनी तसेच यापूर्वी नारायण राणे यांनीही मंजुरी दिली. बाजार भावानुसार या भूखंडापोटी १ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असेही खा. जलील म्हणाले.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा वापर बदलण्यात आला. यातील सगळ्यात मोठा एजंट हा शिवसेना नेते सुभाष देसाई यांचाच मुलगा होता. त्यामुळे याबाबत एसआयटी स्थापन करून चौकशी केली तर सुभाष देसाई तुरुंगात असतील, असा दावा जलील यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग येणे बंद झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीच्या जागा विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे. महाविकास आघाडीत उद्योग मंत्री राहिलेले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही उद्योग आणले नाहीत. मात्र उद्योगासाठी असलेल्या एमआयडीसीच्या जागा त्यांनी विक्री केल्या असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला.
इंडस्ट्रियल प्लॉटचा वापर उद्देश बदल करून बिल्डरांकडून कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले. या सर्व प्रकरणात देसाई यांचा मुलाचा सहभाग होता. देसाई यांचा मुलगा संबधित बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता. तर हा सर्व घोटाळा तब्बल एक हजार कोटीच्या घरात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
एकट्या औरंगाबादमध्ये शंभर-सव्वाशे कोटींचे प्रकरण समोर आले आहे, मग राज्यातील मोठ्या शहरातील एमआयडीसीमधील किती भूखंडांचे उद्देश बदलण्यात आले असतील, याचा अंदाज लावला तर हा घोटाळा एक हजार कोटींच्यावर जाईल. गेल्या दहा-पंधरा वर्षात राज्यातील ३२ हजार एकर इंडस्ट्रीयल भुखंडांचे उद्देश बदलण्यात आले आहेत, यात नारायण राणे, उद्योगमंत्री असतानाच्या काळातील काही एमआयडीसीतील भुखंडाचा देखील समावेश असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : सुभाष देसाई
खासदार इम्तियाज जलिल यांनी माझ्यावर मी उद्योगमंत्री असताना औद्योगिक जमिनींचा घोटाळा केला असा बिनबुडाचा व निराधार आरोप केला आहे. हे आरोप करताना त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे दिले नाहीत. माझ्या चारित्र्यावर अशा रितीने शिंतोडे उडविण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि म्हणून खा. इम्तियाज जलिल यांनी हे निराधार आरोप त्वरित मागे घेऊन माझी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा व नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचे ठरविले आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.