बेळगाव : बेळगावमध्ये आणि परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चेकरी कार्यकर्त्यांशी कर्नाटक पोलिसांनी झटापट केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा विधानसभेत केली.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा कांगावा करत कर्नाटक पोलिसांनी सीमावासियांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली. इतकेच नव्हे तर बेळगावसह सीमा भागात १४४ कलम लावून एकीकरण समितीच्या १० पेक्षाही अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला मेळावा बंद पाडला आहे. तसेच मेळावास्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. आतापर्यंत मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक नेताजी जाधव, आर आय पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
सीमाप्रश्नाचे अधिवेशनात पडसाद
दरम्यान, आज सोमवारपासून नागपूर येथे सुरु झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नाचे पडसाद उमटले. बेळगावच्या मुद्यावर आज जशास तसे उत्तर देऊ म्हणणा-यांची तोंड बंद का झाली, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. सीमाभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय पोलीसांना द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
अमित शहांचा तह बासनात?
सीमावादाच्या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची बैठक झाली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने दोन्ही राज्य सरकार सामंज्यसाची भूमिका घेतील असे अमित शहा यांनी म्हटले होते. अमित शहा यांच्या या विधानाला कर्नाटक सरकारकडून हरताळ फासला गेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (maharashtra ekikaran samiti) वतीने वॅक्सिंग डेपो येथे उभारण्यात आलेले स्टेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच बेळगावात जाणाऱ्या महाविकास आघाडीचा मोर्चा कर्नाटक पोलिसांनी बेळगाव सीमेवर अडवला. यावेळी कर्नाटक पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.