शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद भलताच चिघळला आहे. मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला असतानाच आता मुस्लिम संघटनांनी आगपाखड केली. त्या देखील ‘पठाण’च्या विरोधात सरसावल्या आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदूकोणने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी पाहून अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आणि पहिल्यांदा हिंदू संघटनांनी त्यास आक्षेप घेतला. यानंतर आता देशभरात ‘बिकिनी वादाचा’ भडका उडाला आहे. प्रकाश राज आणि पायल रोहतगीनंतर आता अभिनेत्री शार्लिन चोप्रा यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिल्या.
दिपिकाच्या ‘पठाण’ या चित्रपटाची आणि त्या गाण्यातल्या बिकिनीची चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक कलाकार, नेतेमंडळींपासून सर्व सामान्य माणसापर्यंत सगळेच यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेक हिंदू संघटनांबरोबरच मुस्लिम संघटनांनीही चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तथापि, नवनीत राणा यांनी यावर जालीम उपाय सुचवताना म्हणाल्या, ‘कोणत्याही सिनेमावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर बहिष्कार टाकण्याऐवजी दुसरा मार्ग स्वीकारण्याचा विचार केला पाहिजे. इथे भावना दुखावल्या गेल्या असतील तर बहिष्कार टाकण्याऐवजी सेन्सॉरशिप हाच योग्य मार्ग आहे. कारण त्यामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे आर्थिक नुकसान होते. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही या उद्योगाचा आधार मिळतो. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी हिंदी शिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘पठाण’चे बजेट २५० कोटी रुपये इतके आहे.
दरम्यान, राजकिय पातळीवरही ‘पठाण’ला चांगलाच विरोध होत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनीही अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाला विरोध केला आहे. ते म्हणाले, “शाहरुखने आपल्या मुलीसोबत हा चित्रपट पाहावा, एक फोटो अपलोड करावा आणि जगाला सांगावे की तो आपल्या मुलीसोबत हा चित्रपट पाहत आहे. मी तुम्हाला पैगंबरावर असाच चित्रपट बनवून तो चालवण्याचे आव्हान देतो. .”
चित्रपटगृहांमध्ये ‘पठाण’वर बंदी घालण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात आजपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष गौतम यांनी ही माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही हा चित्रपट ‘आमच्या मूल्यांच्या विरुद्ध’ असल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. सुरेश पचौरी म्हणाले, “हा विरोध पठाणांबद्दल नाही, तर कपडे परिधान करण्याबद्दल आहे.