नवी दिल्ली : मँकिंसे ग्लोबल इंस्टिट्यूट (एमजीआय) च्या अहवालानुसार डिजिटल मार्केटिंग सेक्टरमध्ये २०२५ पर्यंत ६०-६५ लाख नोकऱ्याची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला कुशल कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे १२ वी, पदवी नंतर डिजिटल मार्केटींग क्षेत्रात करिअरची उत्तम संधी आहे.
१५ वर्षांपूर्वी या डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्र अस्तितत्वात नव्हते. किंबहुना डिजिटल क्षेत्राचा दबदबा आणि विस्तार इतका वाढेल याचा कुणाला अंदाजही आला नव्हता. मात्र आता तंत्रज्ञानात सातत्याने होत असलेली प्रगती आणि वाढते डिजिटलायझेशन यामुळे भविष्याचा कल डिजिटल क्षेत्राकडे वाढत आहे हे ओळखून अनेक उद्योग आणि अर्थ व्यवस्था डिजिटल क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
सुरूवातीला इंटरनेट फक्त शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात वापरले जात होते. २०२० मध्ये ७१ कोटी तरुण इंटरनेट वापरायला लागले. आज ८३ कोटीच्या जवळपास लोक याचा वापर करत आहेत. २००८मध्ये जेव्हा गुगलचे सर्च इंजिन सुरू झाले तेव्हा बऱ्याच कंपन्यांसाठी ती एक जादूची छडी फिरवल्यासारखं होतं.
‘सीजीआर’ च्या अहवालानुसार २०२३ मध्ये भारतीय कंपन्यांद्वारे डिजिटल मार्केट सेक्टरमध्ये ३५ हजार ८०९ कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. देशात सध्या डिजिटल मार्केटिंग कॅपिटल २०० अब्ज डॉलर्सच्या जवळपास आहे.