बिजिंग : चीनमध्ये जसा थंडीचा कडाका वाढतो आहे, त्या पाठोपाठ कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गुरुवारी हाती आलेल्या माहितीनुसार कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत संसर्गाच्या आकडेवारीने उच्चान्क गाठला आहे. चीनमध्ये बुधवारी ३१ हजार ४५४ नवीन रुग्ण सापडले. ज्यातील २७ हजार ५१७ रुग्णांमध्ये नवीन लक्षणे नाहीत. चीनमधील सध्याची लोकसंख्या पाहता कोरोना रुग्णांचा हा आकडा फारच कमी आहे. मात्र, रुग्णांच्या वाढत्या संख्येने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे.

२० नोव्हेंबरला २६ हजार ८२४ रुग्णांची नोंद झाली होती. चीनमध्ये झिरो कोव्हिड पॉलिसी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन, चाचण्या आणि कठोर नियमांसाररखी पावले प्रशासनाने उचलली आहेत. तीन वर्षांपासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण घटताना दिसत नाहीत म्हणून अधिक कठोर नियम लागू करण्यात आले. मात्र, या कठोर नियमांमुळे चीनी नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. अनेक भागात नागरिक लॉकडाऊनविरोधात आंदोलन करत आहेत.
चीनमधील ९२ टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्याचबरोबर एका शहरातून दुसऱ्या शहरात लोक प्रवास करु शकत नाहीत. तसेच, मॉल, ऑफिस आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर, जवळपास ३.५ मिलियन नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद आहेत.
अनेक परदेशी कंपन्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था मागील वर्षांच्या तुलनेत फक्त ३.९ टक्क्यांनी वाढली आहे. चीनने २०२२साठी ५.५ टक्क्यांचे उद्दीष्ट्य ठेवले होते.