मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दीपाली सय्यद यांनी आपल्या या प्रवेशाची माहिती दिली आहे.
दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होत असल्याचे पाहून मला हसू येत आहे. शिवतीर्थावरील भाषणानंतर त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केले होते. येत्या ४-५ दिवसांत त्यांची भूमिका बदलू शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी दीपाली सय्यद यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं मत मांडले. अजून त्यांचा प्रवेश झालेला नाही. या त्याच दीपाली ताई आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर दिली.
गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाबद्दल आक्रमक भूमिका दीपाली सय्यद यांनीच मांडली होती. त्यांना स्वत:चे करिअर नव्याने घडवायचे असेल. त्यामुळे त्यांनी नवा मार्ग स्वीकारला असेल. मी भगिनीभाव पाळणाऱ्यापैकी आहे. त्यामुळे त्यांना सूट देते. बऱ्याचदा माणसे आरशात बघून बोलत असतात. माझे मत आहे की पहिला डाव भुताचा म्हणून सोडून दिला पाहिजे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, दीपाली सय्यद यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गट सोडणार असल्याची घोषणा केली. मी येत्या शनिवारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असे दीपाली सय्यद यांनी सांगितले.
पेडणेकर म्हणाल्या, आईचे दूध विकू नका !
शिवसेनेतून ज्यांना जायचे आहे ते जाऊ शकतात, अशा शब्दांत पेडणेकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही सांगितलेले आईचे दूध विकू नका. उगाच हवा प्रदूषण करू नका. उद्धव ठाकरेंना कोणी त्रास देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.